पुणे|
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देताना ‘त्यांच्याच केंद्र सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं होते, हे ते सांगायचं विसरले असतील’, असा टोला लगावला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष असल्याचे मध्यंतरी म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. मात्र, ते एक गोष्ट विसरले की त्यांच्याच केंद्र सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं होते. हे ते सांगायचं विसरले असतील. वारजे माळवाडी येथील अरविंद गणपत बारटक्के दवाखान्याला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यानंतर त्या बोलत होत्या.
यावेळी अभिनेता किरण माने यांच्या प्रकरणावर सुळे म्हणाल्या की, या प्रकरणात वर्तमानपत्र आणि मीडियातून ‘मिक्स सिग्नल’ मिळत आहे. काही त्यांच्या बाजूने येत आहे तर काही त्यांच्या विरोधात येत आहे. नेमके काय झाले आहे याची स्पष्टता अजूनही येत नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले आहे. सत्य काय आहे, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे, असेदेखील यावेळी सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री बदलाबाबत विरोधी पक्षांकडून जी मागणी होत आहे, त्यावर देखील सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या , विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते बोलत राहावं. मुख्यमंत्री हे त्यांचं काम करत राहतील. कोरोना काळात परदेशातून ते केंद्र सरकारने महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. खूप सक्सेस स्टोरी केंद्राने राज्याच्या दाखवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे कौतुक फक्त राज्यातील जनता करत नाही, तर केंद्र सरकारदेखील करत आहे, असेही त्या म्हणाल्या.





