kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

‘संपर्कातून संवाद ‘ निवडणुकीआधीच भाजप   पोहचली घराघरात!

पुणे|
 येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी १ फेब्रुवारी रोजी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांची ‘लगीनघाई’ सुरु असली तरी पक्षीय  पातळीवर आगामी सत्तेसाठी  आरोप – प्रत्यारोपांचे सुरु असलेले  सत्र आणखी जोरात रंगणार आहे. मात्र  सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीकडून  सातत्याने होणाऱ्या   टीकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा थेट  मतदारांच्या घरात पोहचण्याचा संकल्प पहिल्या टप्प्यात पूर्णही केला आहे. ‘संपर्कातून संवाद ‘ या माध्यमातून भाजपने केंद्रापासून ते शहरापर्यंत केलेली कामगिरी मतदारराजापर्यंत पोहचविण्याची मोहीम फत्ते करून निवडणुकीआधीच पहिल्या  टप्प्यातील प्रचारफेरी पूर्ण करून घेतली आहे. 
पुणे महानगरपालिकेवर आगामी सत्तेची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी थेट भाजपसह अन्य पक्षातील इच्छुकांना गळाला लावले जात आहे. आगामी सत्ता राष्ट्रवादीचीच असा ‘गजर ‘ करून  पक्षाला पोषक वातावरण   निर्मिती व  ‘फोडाफोडी’चे राजकारण करताना शहरातील रस्ते, पाणी यासह विकासकामांचे मुद्दे घेऊन भाजपला लक्ष्य  केले जात आहे आणि  टीकेलाच प्रत्युत्तर देण्यात भाजपला जखडून ठेवण्याची रणनीती राष्ट्रवादीची आहे. मात्र राष्ट्रवादीच्या या रणनीतीला छेद देण्यासाठी भाजपने अटलशक्ती महासंपर्क अभियानद्वारे संपर्कातून संवाद ही मोहीम राबविली. सहा लाख पुस्तिकातून केंद्र सरकार, माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या काळातील निर्णय तसेच पुणे शहरात भाजपने मार्गी लावलेले प्रश्न, योजना यांची सविस्तर आणि वास्तववादी माहिती पुणेकरांपर्यंत पालिका निवडणुकीआधीच   पोहचवली आहे. त्यामागे तीन सदस्यीय प्रभाग पद्धत पक्षाला अनुकूल असून,  संभाव्य प्रभाग रचनाही पथ्यावर पडणार असल्याने ;तसेच यंदा प्रचाराला कमी अवधी मिळणार असल्याचे गृहीत धरून ही मोहीम राबविण्यात आली. एकप्रकारे मिनी विधानसभेच्या धर्तीवर पुणे महापालिकेची निवडणूक दुसऱ्यांदा  होणार असल्याने भाजपने पूर्वीचीच ‘चाणक्य नीती’ वापरून राष्ट्रवादीसह अन्य पक्षांना निवडणुकीआधीच गारद केले आहे. निवडणूक विभागाकडून  १ नोव्हेंबर २०२१ अखेर पर्यंत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची जाहीर झालेली मतदारसंख्या पाहिल्यास  पुणे शहरातील मतदारसंघनिहाय मतदारसंख्या साधारणपणे ३१लाख १३हजार ९१८ आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन भाजपने  ‘संपर्कातून संवाद’ ही  पुस्तिका सहा लाखांपेक्षा अधिक पुणेकरांच्या घरोघरी पोहचवली. हजारी प्रमुखांवर नियोजनाची सर्व जबाबदारी सोपवून ज्यांना पुस्तिका दिली,त्यांच्यासमवेतचे छायाचित्र  समाज माध्यमांवर गट करून त्यावरून  व्यक्तींचे नाव, घरातील सदस्य, मोबाईल नंबर आदी  माहितीही  संग्रहित केली आहे .जेणेकरून हाच डेटा ऐन निवडणुकीत उपयुक्त होईल यादृष्टीने नियोजनावर भर देऊन पहिल्या टप्प्यात ही मोहीम  यशस्वीही  केली आहे.  साधारणपणे एका घरात तीन मतदार गृहीत धरून १८ लाख मतदारांपर्यंत भाजप पोहोचल्याचा  ठाम दावा  या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांचा आहे. त्यातही पारंपरिक मतदारांसह अन्य मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात आणखी उत्साह वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *