पुणे| आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत आतापासूनच एकहाती सत्तेचा ‘गजर’ करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) निवडणुकीआधीच ‘गारद’ व्हायची वेळ ओढवली आहे. प्रभागरचनेच्या प्रक्रियेत काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेतल्याची चूक आता महागात पडली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ,आगामी पुणे महापालिका निवडणुकीत (forthcoming Pune Municipal Corporation elections) भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना ( SHIVSENA) , काँग्रेस ( CONGRESS ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन व्यूहरचना आखणे आवश्यक होते.काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची भूमिकाही तीच होती. मात्र राष्ट्रवादीकडून ‘एकहाती’ सत्ता हा गजर आधीपासून करण्यात आला, तशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. त्यानुसार अनेकांचे पक्षप्रवेशही करून घेण्यात आले. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षातील ‘ करारा’नुसार एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते, आजी – माजी पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश करून घ्यायचे नाहीत,असे ठरलेले असताना राष्ट्रवादीने काँग्रेसमधील जुन्या जाणत्यांना, त्यांच्या सग्यासोयऱ्यांना गळाला लावले. काहींचे पक्ष प्रवेश करून घेतले. तसेच भाजपसह ( BJP )अन्य पक्षातील इच्छुकांना राष्ट्रवादीच्या गोटात आणण्यासाठी फिल्डिंगही लावली. मात्र हे करताना आगामी सत्ता राष्ट्रवादीचीच असा सातत्याने गजर सुरु केला. त्यामुळे सत्ता येण्याआधीच कोण कारभारी, कोण नामधारी हा प्रश्न महाविकास आघाडीत पर्यायाने स्थानिक पातळीवर ऐरणीवर आला.सत्तेची सूत्रे स्वतःकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने प्रारूप प्रभाग रचनेत काँग्रेसला बाजूला ठेवून एकतर्फी अनुकूल प्रभाग रचना करून घेण्यात यश मिळवले मात्र त्यावर भाजपने ऐनवेळी ‘ पाणी फिरवले ‘ ,त्यामागे काँग्रेसची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडली असली तरी काँग्रेसचे हितही साधले गेले आहे.
वास्तविक राष्ट्रवादीकडून काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन प्रभाग रचना करणे अपेक्षित होते मात्र राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या नेत्यांना डावलण्यात आले. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ही बाब भाजपच्या नेत्यांना कथन केली. त्यानुसार भाजपने दबावतंत्र वापरून काँग्रेसच्या काही दिग्गज माननीयांसह भाजपला अनुकूल अशी प्रभाग रचना करून घेण्यात यश मिळवून राष्ट्रवादीला प्रतिकूलतेच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेला प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा (The draft ward structure plan) यापूर्वी कधीही गाजला नव्हता की मार्गदर्शक तत्वांचा भंग हे गालबोट देखील लागले नव्हते. गतवेळी राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजपने अनुकूल प्रभाग रचना करून घेतली,मात्र ती करताना त्यांनी प्रतिस्पर्धी म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या पक्षातील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या काही दिग्गजांनाही अनुकूल प्रभाग रचनेत सामावून घेतले होते. त्यामुळे त्यावेळी प्रभाग रचनेवरून कोणतीही गडबड झाली नव्हती.याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले. मात्र यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जोरावर राष्ट्रवादीच्या स्थानिक काही मोजक्या नेत्यांनी राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसला बाजूला सारताना सोईनुसार शिवसेनेचे काही,बाकी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणि स्वतःकडे सत्तेची सूत्रे ठेवण्यासाठी प्रभाग रचनेत नैसर्गिक हद्दींचे उल्लंघन करून सोईनुसार प्रभाग रचना करवून घेतली मात्र काँग्रेसने अचूक टायमिंग साधत भाजपद्वारे राष्ट्रवादीचे मनसुबे उधळून लावले आहेत. परिणामी राष्ट्रवादीच्या गोटात आता अस्वस्थता पसरली आहे.





