पुणे|देशाच्या उभारणीत आणि प्रगतीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. मात्र आज आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून समाजमाध्यमांवरून चुकीचा इतिहास सादर करण्याचे कारस्थान सुरु झाले आहे. देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेसने काय काय केले, हे सांगण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला आणि पडत आहे,अशी खंत व्यक्त करताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशाचा खरा इतिहास जनतेपुढे मांडण्याची जबाबदारी आता काँग्रेस पक्षाची आहे,असे प्रतिपादन केले.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या ’सुवर्ण विजय’ द्विसप्ताहात राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल कै. बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या द्विसप्ताहातील ‘एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी’ 50 फुटी फ्लेक्सवर स्वाक्षरी केली. त्यानंतर कै. बागुल उद्यान येथे ‘इंदिरा गांधी आणि1971 युद्ध’ या पेंटिंग प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसच्या सत्तेच्या कालखंडात देशाची सर्व क्षेत्रात प्रगती झाली. दारिद्रय निर्मूलनाचे मोठे काम काँग्रेसच्या काळातच झाले. काँग्रेसने काय काय केले, हे सांगण्यात मात्र कमी काँग्रेस पक्ष पडला अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून काहीजण देशाचा चुकीचा इतिहास मांडत आहेत. इतिहास बदलण्याचे कारस्थान ‘थिंक टॅंक’ च्या माध्यमातून चालवले जात आहेत. त्याचे दूरगामी परिणाम निश्चित होणार आहेत. समाजमाध्यमांद्वारे चुकीच्या बातम्या प्रसारित करून जनतेची दिशाभूल सुरु आहे. अशावेळी देशासाठी काँग्रेसने काय केले,याची माहिती जनतेला पुन्हा करून देण्यासाठी आबा बागुल यांनी आयोजित केलेले उपक्रम कौतुकास्पद असून सर्वत्र असे कार्यक्रम झाले पाहिजेत. त्यातून काँग्रेसच्या कार्याचे, योगदानाचे जनतेला स्मरण करून देण्याची नितांत गरज आहे, तरच देशात पुन्हा ‘सोनियाचे दिन ‘ येतील. असेही ते म्हणाले.