मुंबई| एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर घेतलेल्या ‘त्या ‘ पहाटेच्या शपथविधीबद्दल आता पश्चाताप होत असल्याची भावना व्यक्त केली. पहाटे शपथविधी कसा झाला, त्याला काय कारण होते, त्यानंतर कोणत्या घडामोडी घडल्या यावर आता फडणवीस हे पुस्तकाद्वारे प्रकाशझोत टाकणार आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत शपथ घेण्याच्या निर्णयावरुन पश्चात्ताप व्यक्त केला आहे. देशभर गाजलेल्या या शपथविधीबद्दल संपूर्ण घटनाक्रम पुस्तकाद्वारे समोर आणणार असल्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
२८ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. पण त्या अगोदर २३ नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीला सुद्धा दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आजही त्या शपथविधीचा पश्चाताप होतो, असे मत देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले आहे. फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने दगाफटका दिल्यानंतर आम्ही अजित पवार यांच्या बरोबर एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत शिवसेनेने खंजीर खुपसला होता. मात्र त्यानंतर जे काही घडले त्यामुळे आम्हाला आजही त्या शपथविधीचा पश्चाताप होत आहेत. या शपथविधीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या तिन्ही पक्षांचे नेतृत्व करत आपल्या हाती सूत्र घेतले आणि भाजपला विरोधी पक्षात बसण्यास मजबूर केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा शपथविधि झाला नसता तर चांगल झाले असते. असेही सारखे वाटते. त्यावेळी काय झाले होते आणि कोणी काय केले होते याची पूर्ण माहिती आपणाला असून यावर आपण एक पुस्तक लिहिणार आहे आणि त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.