आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत मात्र त्यात राष्ट्रवादी विरुद्ध विद्यमान सत्ताधारी भाजप अशी थेट लढत असल्याचे गृहीत धरले जात आहेत. किंबहुना तसे चित्र निर्माण केले जात आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने एकहाती सत्ता असतानाही कोणती भरीव विकासकामे केली? हा प्रश्नच वादाच्या नव्हे तर नंतर श्रेयाच्या राजकारणात रंगणार आहे. तूर्तास राष्ट्रवादीकडून गेल्या पाच वर्षात पुण्याचा विकास भकास अशी टीका भाजपवर केली जात आहे. सध्यस्थितीत ही रणनीती राष्ट्रवादीची असली तरी भाजपच्या सत्तेत जी जी विकासकामे मार्गी लागली, पूर्णत्वास जात आहेत. त्यात राष्ट्रवादीचेही योगदान महत्वपूर्ण आहे. पुणे पॅटर्नच्या काळात राष्ट्रवादी कारभारी आणि शिवसेना – भाजप नामधारी असा कारभार होता. त्यावेळी अनेक विषय, प्रकल्प मार्गी लावताना जे जे ठराव दिले. ते पुणे पॅटर्नच्या काळातच. पण नंतर मोदी लाटेने केंद्रात सत्ता बदल झाला आणि अन्य पक्षांचे ‘ होत्याचे नव्हते ‘ असे झाले. राज्यातही सत्ताबदल झाला आणि पुणे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. काल -परवा एकमेकांसमवेत सत्ता भोगणारे नंतर विरोधात बसले. मात्र आता आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपाला लक्ष्य करण्याचे सूत्र अवलंबिले जात आहे . मग प्रश्न असा, ज्या कामांवर आता टीका केली जात आहे. ती कामे कुणाच्या काळात मंजूर झाली? हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. साधे उदाहरण द्यायचे म्हटल्यास समान पाणी पुरवठा योजना याचे देता येईल. ही योजना तीच आहे, जी पुणे पॅटर्नच्या काळात वादग्रस्त ठरली होती. इतकेच काय त्यातील ‘बनवा – बनवी’ही चव्हाट्यावर आली होती. मात्र पालिकेत सत्ता बदल झाला खरा ;पण योजना तीच, मात्र नाव बदलून तिची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यासाठी रस्त्यांची खोदाई सुरु झाली आहे. खड्ड्यातून रस्ते शोधण्याची वेळ पुणेकरांवर ओढवली आहे. आता खड्ड्यांचा उल्लेख आला म्हटल्यावर याच रस्त्यावरील खड्ड्यांचे भांडवल करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणेकरांना ‘कारभारी बदला’ अशी हाक दिली होती आणि काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली होती मात्र पालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या आधाराने राजकीय आखाड्यात पुणे पॅटर्नचा जन्मही घातला. हा असा पॅटर्न होता, ज्यात सत्तेत असणारा एक पक्ष विरोधी पक्ष म्हणूनही सामावलेला होता. त्यावेळी पुणे पॅटर्नमध्ये सत्तेत असणारा भाजप पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होता. असा हा आगळा वेगळा पॅटर्न पुण्यात नव्हे तर राज्यातही विरोधी पक्ष थेट नामधारी कसा ठरविता येतो हे दाखविण्याची किमया त्यावेळी साधली गेली होती. त्यात आधी बांधायचे नंतर तोडायचे आणि नव्याने बांधायचे हा धाटणीचा कारभारही पुणेकरांनी पाहिला.बीआरटीचे ‘तीनतेरा ‘ कसे वाजले हे त्याचे एक उदाहरण.अशी अनेक उदाहरणे आहेत. अगदी कोरोना काळात पुणे विद्यापीठ रस्त्यावरील जमीनदोस्त केलेला उड्डाणपूल. त्यामुळे अशा कारभारात नक्की कुणाचे हित जोपासले गेले हा भाग निराळा.आता पुणे महापालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने जय्यत तयारी चालवली आहे. जुने जाणते काँग्रेसचे मातब्बर पक्षाच्या डेऱ्यात सामील करून घेतले आहेत आणि जे यापूर्वी भाजपच्या गोटात दाखल झाले होते,तेही गळाला लावले आहेत. त्यात भाजपमधील नाराजांचाही ओढा राष्ट्रवादीकडेच असणार आहे. ज्यांना राष्ट्रवादी नको,त्यांना शिवसेना आपलीशी वाटणार आहे. या धामधुमीत काँग्रेस पक्षाला गृहीत धरले जात नसले तरी शहर पातळीवर संघटनात्मक बांधणीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्राधान्य दिले आहे.गटातटात विभागलेल्या आणि स्वयंघोषित नेते जास्त झालेल्या पुण्यात थेट कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन ते ऊर्जा देत आहेत. पण काहीही असले तरी काँग्रेसचा भर संघटनात्मक बळकटीकरण आणि दुसरी फळी म्हणजे युवकांची शक्ती तयार करण्यावर आहे. दुसरीकडे शहराच्या पर्यायाने पालिकेच्या राजकारणात भाजपचे स्थान अव्वल रहावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाचारण करण्याची रणनीती भाजपची आहे. त्याला कारणही तसेच आहे. आता तीनच्या प्रभागात पक्षाचे उमेदवार कसे निवडून येणार यापेक्षा कोणती ठोस कामे केली ?हा प्रश्न भेडसावत आहे. शहराच्या विकासकामांच्या यादीवर प्रभागात कसे मतदान मिळणार ? या प्रश्नासह त्यावेळी मोदी लाट होती. त्यामुळे विजय सहजसाध्य झाला.ज्यांना कोण ओळखत नव्हते, ते पालिकेच्या सभागृहात दाखल झाले. आज पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे आणि महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे आता भाजपचे ‘चाणक्य’म्हणून गणले जाणारे अमित शहा पुण्यात येणार आहेत मात्र ते विकासावर बोलणार की भाजपच्या कामगिरीवर ? की या मुद्द्यांना बगल देण्यासाठी ‘सोशल इंजिनिअरिंग’द्वारे मतांचे समीकरण दृढ करणार हा मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरणार आहे. तसे पाहिले तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही पुण्यात लक्ष घालणार आहेत आणि पुणे महापालिका ताब्यात घेणे यासाठी राष्ट्रवादी प्रतिष्ठापणाला लावणार आहे. मग छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मराठा – दलित या समाजाची एकगठ्ठा मतांचे समीकरण करण्यासाठी ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या प्रयोगावर भर देणार असतील तर त्याचा फटका कुणाला ? हा खरा प्रश्न आहे. निवडणुकीनंतर पुणेकरांनी कुणाला स्पष्ट बहुमत दिले हे स्पष्ट होईलच मात्र सत्तेच्या सारीपाटात पुन्हा एक नवा पॅटर्न हे चित्र दिसले तरी नवल वाटण्यासारखे काही असणारच नाही. कारण एकत्र सत्ता भोगणारे आज एकमेकांविरोधात असले तरी जनतेच्या हिताच्या नावाखाली पुन्हा एकत्र का येणार नाहीत हाच मुद्दा तूर्तास महत्वाचा आहे.
-प्रवीण पगारे
९४२२५३२१२२