शिर्डी। लखीमपूर प्रकरणात मोदी सरकारला बदनाम करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे. मात्र तो आम्ही उधळून लावणारच अशी भूमिका मांडताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेला ‘अजूनही वेळ आहे,आपले नुकसान करायचे नसेल तर अजून वेळ गेलेली नाही’ अशा शब्दात पुन्हा साद घातली आहे.
शिर्डीत आलेल्या रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेला ही साद घातली. ते म्हणाले, अडीच- अडीच वर्षे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला आणि अडीच वर्षे भाजपला अशा पद्धतीने युती पुन्हा होऊ शकते. शिवसैनिकांचीही आतून हीच इच्छा आहे की, शिवसेना व भाजपने पुन्हा बरोबर यावे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले.
… तर ईडी मागे लागणार नाही :राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.या प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले, ईडी हे स्वतंत्र खाते आहे. मोदी सरकार कोणावरही अन्याय करणारे सरकार नाही,ते सर्वांना साथ देणारे सरकार आहे. जर तुमचे रेकॉर्ड ठीक असेल तर ईडी मागे लागणार नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी अनियमितता आढळते,तिथे ईडीची चौकशी होते. त्यामुळे मुद्दाम कुणाला त्रास देण्याचा हेतू मोदी सरकारचा नाही.
‘ती’ तुलना करणे ही चुकीची बाब: लखीमपूरचा मुद्दा पकडून जर मोदी सरकारला बदनाम करायचा डाव असेल तर तो हाणून पाडला जाईल. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर मी अनेक वर्षे काम केले आहे. मात्र लखीमपूरमधील घटनेची जालियनवाला बागेशी तुलना करणे ही चुकीची बाब आहे. या घटनेबाबत येत्या ११ तारखेला महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा अनाठायी असल्याची भूमिकाही आठवले यांनी यावेळी मांडली. यावेळी नेहमीप्रमाणे आपल्या कवितेतून महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडले. ‘ मी येथे आलो आहे राधाकृष्ण विखेपाटील यांना साथ देण्यासाठी,आणि आम्ही दोघे मिळून मुंबईला जात आहोत, महाविकास आघाडीशी बदला घेण्यासाठी’ अशा चारोळीच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला.