Conflict in NCP again

‘इलेक्टीव्ह मेरिट’साठी राष्ट्रवादीकडून सर्व्हे !

पुणे । प्रवीण पगारे 

आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.  पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा  बहुमताचा  झेंडा फडकविण्यासाठी व्यूहरचना आखली असून त्याचाच एक भाग म्हणून खासगी यंत्रणेमार्फत ‘ इलेक्टीव्ह मेरिट’साठी सर्व्हे सुरु केला आहे. विशेष म्हणजे तीन पातळीवर हे सर्व्हे वेगवेगळे  होत आहेत.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यंदा  कोणत्याही स्थितीत पक्षाचे स्पष्ट बहुमत कसे येईल यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार मागील काही  निवडणुकांवेळी स्थानिक नेतृत्व किंवा नेत्यांकडून काही  मर्जीतील उमेदवारांसाठी आटापिटा केला गेला. प्रत्यक्षात त्यांनी शिफारस केलेले उमेदवारच पराभूत झाले होते.  इतरवेळी एकमेकांविरोधात असणारे स्थानिक नेते निवडणुकीवेळी मात्र आपापल्या व्यक्तींना उमेदवारी मिळविण्यासाठी एकत्र येऊन  कोणत्या प्रभागातून कोण , कसा निवडून येईल याचे आभासी चित्र अहवालातून रंगवतात. अगदी पुण्यातील एका एजन्सीने सादर केलेल्या अहवालातही फेरफार करण्यात आल्याचा प्रकार  त्यावेळी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आला होता. त्यानुसारच स्थानिक पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन उमेदवारी देण्याचा पायंडा  मोडीत काढण्यासाठी  पक्ष नेतृत्वाकडून खासगी यंत्रणेकडून दोन वेळा सर्व्हे करून त्यानुसार उमेदवार निवड प्रक्रिया राबविण्यात आली  होती. 

यंदाही उमेदवार वाटपातील  ‘घुसखोरी’ टाळण्यासाठी ‘इलेक्टिव्ह मेरिट’ तपासूनच प्रत्येक वॉर्डात  उमेदवारी कोणाला द्यायची याचा फैसला होणार आहे. त्यासाठी तीन सर्व्हे खासगी  एजन्सीमार्फत होत आहेत.या एजन्सीमार्फत प्रत्येक वॉर्डाचा तसेच विद्यमान माननीय, इच्छुक या सर्वांची  वैयक्तिक व सामाजिक स्तरावरील प्रतिमेचा डाटा गोळा केला जाणार आहे. त्यात कोण कुणाशी संबंधित आहे.स्थानिक पातळीवरील मतांचे समीकरण या मुद्यांचाही  समावेश या सर्व्हेच्या कामात करण्यात आला आहे.तर पूर्वी दिग्गज असणारे पण सध्या राजकीय प्रवाहात नसले तरी त्यांना मानणारा वर्ग त्या त्या भागात आहे, अशी  राजकीय मंडळी पालिकेतील पक्षीय बलाबलसाठी कशी पथ्यावर पडतील याचीही माहिती गोळा केली जात आहे. पक्षात गटबाजीविरहित उमेदवार प्रक्रिया व्हावी याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.   जनमानसात लोकप्रिय कार्यकर्ते, पण पक्षीय राजकारणात पडद्याच्या आड असलेल्या चेहऱ्यांना संधी देताना भाजपच्या विद्यमानांना ‘घरचा रस्ता’ दाखवण्याची रणनीती यामागे आहे.त्यासाठी काँग्रेसमधील जुन्याजाणत्यांचे ‘ इनकमिंग’ सुरु करण्यात आले आहे.तसे भाजपमधील नाराजांनाही  सामावून घेतले जाणार आहे. सद्यस्थितीत पक्षहितासाठी स्थानिक नेत्यांच्या ‘लॉबिंग’ला कोणताही थारा द्यायचा नाही, यावर भर दिला जात असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *