पुणे । प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सत्तेचे ‘गणित’ जुळविण्यासाठी ‘बेरजेचे राजकारण’ ही जोरात सुरु झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येईल असे बोलले जात असले तरी दोन्ही पक्षात मात्र परप्रांतीयांचा मुद्दा पेटणार अशी चिन्हे स्पष्ट आहेत,त्यातही या मुद्द्यावरून मनसे कोणती भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने भाजपची सोडलेली साथ, मनसेने हिंदुत्वाचा हाती घेतलेला झेंडा याचा कुणाला फायदा होणार यापेक्षा कुणाला तोटा हा मुद्दा आगामी काळात महत्वाचा ठरणार आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने तयारी केली असली तरी राष्ट्रवादीच्या भक्कम साथीने शिवसेना आणखीनच बळकट झाली आहे.त्यात काँग्रेसने दिलेला स्वबळाचा नारा पाहता, भाजपची आणखी कोंडी झाली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर चित्र बदलणार आहे. काँग्रेसची भूमिका स्वबळाची असली तरी हे सर्व ‘ ठरवून ‘ या सदरात आहे मात्र आम्हीही कमी नाही यापेक्षा जनमानसात पुन्हा स्थान मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याची मोहीम सुरु झाली आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था नामधारी अशीच आहे. एककाळ प्रबळ असलेला काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष राज्याच्या राजकारणात मात्र प्रादेशिक पक्षांमुळे सत्तेत आला आहे.सत्तेसाठी ‘पॅटर्न’ कसा होऊ शकतो , हे राष्ट्रवादी पक्षाने राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालीन ‘पुणे पॅटर्न’ द्वारे दाखवून दिलेच आहे ;पण ‘एका दगडात’ च्या धर्तीवर खेळीही यशस्वी केली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये भाजपाची वाट बिकट होणार आहे.एकतर कट्टर हिंदुत्वाची ओळख असलेल्या भाजपने केंद्रात सत्तेवर येण्यासाठी धोरणातच बदल केला.या पक्षाशी वर्षेनुवर्षे युतीत असलेल्या शिवसेनेने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेसाठी वेगळी भूमिका घेतली तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी प्रादेशिक पक्ष बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे.परिणामी वर्चस्व मिळेल हा भाग नंतरचा असला तरी तूर्तास अस्तित्वासाठी ही रणनीती आखली गेली आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यात राज्यात भाजपला पुन्हा वर्चस्व मिळवायचे आहे. त्यामुळे जरी मनसे आणि भाजप हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्रात एकत्र आले तरी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून या दोन्ही पक्षात ‘पारा’यण अटळ आहे त्याहीपेक्षा राज्याच्या राजकारणात या नव्या युतीला केंद्रात भाजपबरोबर सत्तेत असलेले सहकारी पक्ष कोणती भूमिका घेतात यावर पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत. तूर्तास आभासी चित्र रंगवणे आणि ते जनतेवर बिंबविणे हाच अजेंडा जोरात राहील.