पुणे |
झोपडपट्टीधारकांना हक्काचे व स्वत:च्या मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त झाले पाहिजे, यासाठी येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू,त्यासाठी सदा आनंदनगरच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना प्रभावीपणे राबविली जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले .
मंगळवार पेठ येथे सदा आनंदनगर येथील एसआरएच्या माध्यमांतून साकारलेल्या तिसऱ्या टप्प्यातील १३० घरांच्या चावी वाटप व करारनामा आणि कै. मातोश्री श्रीमती पद्मावती(अम्मा ) कृष्णा शेट्टी व्यापारी व निवासी संकुलाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर खासदार वंदनाताई चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, श्रीकांत शिरोळे, भीमराव पाटोळे,माजी उपमहापौर डॉ. एस. एम. तोडकर, माजी नगरसेवक बुवा नलावडे, जया शेट्टी, शेख अल्ताफ इलाहीबक्ष, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्यासह संयोजक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, नगरसेविका सुजाता शेट्टी, सिद्धांत शेट्टी ,साक्षात शेट्टी आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अजितदादा पवार म्हणाले कि, पुण्याचा चेहरा मोहरा बदलणारा हा प्रकल्प आहे. झोपडपट्टी वासियांना हक्काची घरे देणारा ‘सदा आनंदनगर’ हा प्रकल्प आदर्शवत ठरला आहे. आज श्री. शेट्टी यांचा वाढदिवस आहे, हे मला माहित नव्हते. मात्र गरिबांना त्यांच्या मालकीचे घरे देण्यासाठी त्यांचा पुढाकार आणि साकारलेला हा प्रकल्प पाहता, आज या परिसराचा कायापालट झाला आहे. नागरी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. इतकेच नाहीतर या परिसरातील जागांचे दर वाढले आहेत.शहराच्या विकासासाठी आणि झोपडपट्टी मुक्त शहरासाठी सदानंद शेट्टी आणि परिवाराचे योगदान महत्वाचे आहे. आज स्वर्गीय मातोश्री पद्मावती ( अम्मा ) शेट्टी या हयात नाहीत, त्यांना विनम्र अभिवादन करतो. अम्मांचे स्वप्न सदानंद शेट्टी यांनी पूर्ण केले आहे.त्यामुळे आज हक्काच्या घरे मिळालेल्या झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावले आहे.

पुढील आठवड्यात बैठक
मंगळवार पेठ व परिसरातील खासगी व सरकारी जागेवरील १७ झोपडपट्ट्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यासंदर्भात पुढील आठवड्यात एक बैठक नाईकनवरे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर व सदानंद शेट्टी यांच्यासमवेत आयोजित करून योग्य निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर टीडीआरच्या संदर्भांत देखील भविष्यात चांगले धोरण तयार करण्यात येईल,असेही यावेळी अजित पवार यांनी नमूद केले.
झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी मी प्राधान्य देणार आहे. झोपडपट्टी मुक्त शहर हे ध्येय आहे. त्यासाठीच मी राजेंद्र निंबाळकर यांना आणले आहे. प्रत्येक झोपडपट्टी वासियांचे जीवनमान बदलले पाहिजे यासाठी सदानंद शेट्टी यांच्यासमवेत आम्ही एकत्र काम करणार आहोत. शहरातील झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास सदा आनंदनगरच्या धर्तीवरच करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. घरे मिळाली तरी ती विकू नका, सन्मानाने जगण्याची ही संधी आहे,असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

एक वेगळा पॅटर्न
यावेळी सदानंद शेट्टी म्हणाले कि, मंगळवार पेठ सारख्या अठरापगड जातींचा समावेश असलेल्या भागात सदा आनंदनगर हा प्रकल्प साकारला. हा प्रकल्प उभा करण्यात आई स्व. पद्मावती अम्मा शेट्टी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. गोरगरिबांना हक्काचे घरे मिळावं यासाठी नगरसेविका सौ. सुजाता सदानंद शेट्टी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प उभा राहिला. सदा आनंदनगर हा एक वेगळा पॅटर्न निर्माण झाला आहे. असे ते म्हणाले.
नगरसेविका सौ. सुजाता सदानंद शेट्टी यावेळी म्हणाल्या कि, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सदा आनंदनगर हे एक रोल मॉडेल ठरले आहे. याच धर्तीवर अन्य झोपडपट्ट्यांचा विकास व्हावा आणि गरिबांचे जीवनमान उंचावले पाहिजे. मुंबईचे शांघाय होईल कि नाही पण दादा तुम्ही पुण्याला सिंगापूर करून दाखवा अशी विनंतीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र निबांळकर म्हणाले, झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर करताना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीने नागरिकांना पक्की व मोफत घरे उपलब्ध करुन देताना प्राधिकरणाची प्रतिमा उंचविण्यासाठी प्रयत्न केले जाईल. यासाठी गरज पडल्यास सर्वांना विश्वासात घेवून नियमात बदल केले जाईल, असा विश्वास निबाळकर यांनी व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नामदेव खराडे, रहमान शेख, बशीरअली शेख, सुमन दिघे व सुभाष कदम यांना घराच्या चावी व करारनामा प्रदान करण्यात आला.सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.
पक्ष नाही… विकासालाच मत
गरिबांचे आयुष्यमान उजळावे, त्यांना हक्काची घरे मिळावीत. त्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी अतोनात कार्य करणाऱ्या सदानंद शेट्टी आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर येथील नागरिकांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी इथे कधीच पक्ष न पाहता विकासालाच म्हणजे शेट्टी परिवारातील सदस्याला मत दिले जाते, हेही महत्वाचे आहे. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.