पुणे:
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसेंना दुसऱ्यांदा चौकशीची नोटीस बजावली असून चौकशीसाठी मंदाकिनी खडसेंना आज (बुधवारी) मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जुलै महिन्यात ईडीने मंदाकिनी खडसेंना पहिल्यांदा चौकशीची नोटीस बजावली होती. तेव्हा प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहता येणार नसल्याने त्यांनी वेळ मागून घेतला होता. आता त्यांना दुसऱ्यांदा नोटीस आली आहे. खडसे हे महसूलमंत्री असताना त्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन करून भोसरी एमआयडीसीतील भूखंड आपली पत्नी व जावयाला मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे मंत्रिपद गेले होते. सध्या ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याअगोदरही एकनाथ खडसे यांची दोनदा ईडीने चौकशी केली आहे. दरम्यान, त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे याच प्रकरणात 5 जुलैपासून अटकेत आहेत. मंदाकिनी खडसे आज होणाऱ्या चौकशीला हजर राहणार आहेत किंवा नाही, याबाबत अजून स्पष्टता नाही.