मुंबई महापालिका रणधुमाळीत मराठी अस्मिता विरुद्ध भाजपचे समीकरण

५ जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या.या भेटीगाठींमुळे दोन्ही ठाकरेंच्या युतीबाबत चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी, राज ठाकरेंनी मात्र आपले पत्ते उघड केले नाहीत. मनसेच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी एक वक्तव्य केले, ज्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला. “वीस वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडताय?” असे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना विचारले. या विधानातून त्यांनी योग्य संदेश पोहोचवला असल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले. राज ठाकरेंनी मनसैनिकांच्या मनात युतीच्या आशा जिवंत ठेवल्या असल्या तरी, अधिकृत घोषणा केलेली नाही. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले. ठाकरेंच्या शिवसेनेने यावर बोलताना, युतीची प्रक्रिया सुरू असू शकते असे संकेत दिले.
शिंदेंच्या शिवसेनेने राज ठाकरेंना पूर्वी मिळालेल्या वागणुकीची आठवण करून दिली. भाजपने मात्र आपली महायुती निश्चित असल्याचे आणि ५१ टक्के लढाई जिंकणार असल्याचे म्हटले. पण प्रत्यक्षात ठाकरेंच्या युतीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मार्ग सोडून गेलेल्या ठाकरेंना जनता मतदान करणार नाही. असा ठाम दावा केला शिवाय आधी डिनर मग ब्रेकफास्ट आणि नंतर लंच अशा डिप्लोमसी केल्या तरी काही उपयोग नाही,असे ते म्हणाले.तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणी कुणाबरोबर जायचे ते जाऊ द्या.शरद पवार त्यांच्याबरोबर गेले तरी आम्हाला काय करायचे.आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत,अशी भूमिका मांडली.
दुसरीकडे मुंबई महापालिकेवर झेंडा कुणाचा ? यावरून राजकारण पेटले आहे. उत्तर भारतीयांच्या मतपेटीद्वारे मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा केलेला प्रयोग निवडणुकीआधीच वादात सापडला आणि हिंदी भाषा सक्तीवरून भाजपचीच कोंडी झाली शेवटी त्यावरून घुमजाव करणाऱ्या भाजपाला आता उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीचा धसका बसला की काय म्हणून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सहा जिल्ह्यांच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन मराठी उत्तर भारतीय आणि गुजराती मतांची गोळा बेरीज कशी होईल याची चाचपणी केली शिवाय कोणत्या वार्डात कोणते उमेदवार यासह महायुतीतील प्रबळ उमेदवारांवर चर्चा केली. त्यात मंत्री छगन भुजबळ यांनीही ठाकरे बंधू एकीचा फटका निश्चित बसेल अशी भूमिका मांडली.
उत्तर भारतीय मतदारांच्या जीवावर पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी हिंदी भाषेची सक्ती हा मुद्दा पुढे आणणाऱ्या भाजपची ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे कोंडी झाली आहे. त्यात मराठी जन व मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पुन्हा एकवटणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मतांचे गणित फिस्कटणार या धास्तीने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.वरकरणी आम्हाला काही फरक पडत नाही असे म्हणणारी भाजप मात्र आता ठाकरे बंधूंच्या युतीमुळे अलर्ट मोडवर आली आहे.