घडतंय बिघडतंय
– प्रवीण पगारे
लोकसभा मतदारसंघात ( Latur Lok Sabha constituency) काँग्रेसला( Congress)वर्चस्व प्राप्त करायचे आहे तर महायुतीला या मतदारसंघावरील पकड कायम ठेवायची आहे.मात्र उमेदवारीत डावलले गेल्याने भाजपमध्ये ( BJP) इच्छुकांची नाराजी मोठी आहे.त्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील शह काटशहाचे राजकारण आतापासून सुरू झाल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षातील फितूर मंडळींची धास्ती भाजपला आहे शिवाय रेल्वे कोचच्या कारखान्यातून निर्माण होणारे रेल्वेचे डबे भाजपच्या विजयासाठी ‘इंजिन ‘कसे ठरवायचे हा पेचही भाजपपुढे आहे.
यंदा महायुतीकडून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा लोकसभेच्या आखाड्यात उतरवले आहे.मात्र त्यांना दिलेल्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये इच्छुकांची नाराजी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.पाच वर्षे गेली, आता पुढची पाच वर्षे वाया जाणार मग राजकीय महत्वाकांक्षा कशी पूर्ण होणार यावरून भाजपच्या वर्तुळात नाराज मंडळींमध्ये ‘ पारा ‘यण होत आहे.त्यामुळेच येत्या ७ मे रोजी मतदान असतानाही भाजपच्या प्रचाराला अद्यापही वेग नाही.केवळ बुथ मेळावे, सुपर वॉरियर्सची बैठक यातच विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा प्रचार अडकला आहे.त्यात महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी, आर पी आय तसेच पाठिंबा देणाऱ्या मनसेही प्रचारापासून अजूनही अलिप्त आहेत.
त्यामुळे विद्यमान खासदारांना दिलेली उमेदवारी हीच नाराजीस कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे मात्र मतदारांमध्ये भाजपच्या कारभारावर नाराजी मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र भासवले जात आहे.वास्तविक महायुतीकडे तीन आमदार,दोन विधान परिषद सदस्य,तसेच संजय बनसोडे कॅबिनेट मंत्री असताना प्रचारात मात्र ताकद हवी तशी का दिसत नाही. हाच मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरला आहे.त्यात काँग्रेस नेत्यांची सून डॉ.अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याचा कितपत फायदा होईल, यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी मिळाली तर काय या प्रश्नाने भाजपमधील नाराज मंडळींना ग्रासले आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असून लातूर शहर ,लातूर ग्रामीण, निलंगा,उदगीर,अहमदपूर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.यंदा महायुतीचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे डॉ.शिवाजी काळगे यांच्यात खरी लढत असली तरी ती अटीतटीची होणार आहे. वंचितने नरसिंगराव उदगीरकर यांना उमेदवारी दिली असली तरी एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी तीन उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे ,१२ उमेदवार नोंदणीकृत राजकीय पक्षांचे तर १३ उमेदवार अपक्ष आहेत. त्यात या मतदारसंघावर काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यत्वे आमदार अमित देशमुख यांचे राज्यात वर्चस्व निर्माण व्हावे. एकप्रकारे काँग्रेसमध्ये त्यांचे स्थान प्रबळ व्हावे यासाठी संपूर्ण देशमुख परिवाराने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
अमित देशमुख व धीरज देशमुख यांनी सर्व सूत्रे हाती घेतली असून जातीय समीकरणे जुळविण्याकडेच लक्ष दिले आहे. त्यातही ज्यांची नाराजी आहे. त्यांचे मन वळवून त्यांना प्रचारात अग्रभागी आणले आहे. वास्तविक १९८० पासून २००४ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. विशेष म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर हे सात वेळा निवडून आले होते. मात्र २००४ मध्ये भाजपच्या रूपाताई पाटील यांनी हा मतदारसंघ काबीज केला. २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्याने कोल्हापूरचे जयवंत आवळे हे काँग्रेसकडून निवडून आले मात्र नंतर दोन निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली.२०१४ ला सुनील गायकवाड हे अडीच लाख मतांनी निवडून आले तर २०१९ ला सुधाकर शृंगारे यांना २ लाख ८९ हजार १११ मताधिक्य मिळाले. या पार्श्वभूमीवर पुन्हा या मतदारसंघावर काँग्रेसने कब्जा मिळविण्याकडेच लक्ष दिले आहे. त्यानुसार अमित देशमुख यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे तर भाजपने संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर धुरा सोपवली असली प्रचारात सुसूत्रता नसल्याने तसेच अंतर्गत नाराजी व मित्र पक्षांची अलिप्तवादाची भूमिका यामुळे यंदा भाजपला पक्षातील नाराज फितुरांची धास्ती असल्याचे वास्तव असल्याकडे राजकीय अभ्यासक लक्ष वेधत आहेत.
‘रेल्वे’वर भाजपची भिस्त
दुसरे असे कि, १२ एप्रिल २०१६ रोजी मिरजेहून पाण्याने भरलेली रेल्वे लातूरकरांची तहान भागविण्यासाठी निघाली. त्यानंतर मात्र लातूर महापालिकेत भाजपचे ३६ नगरसेवक निवडून आले.इतकंच काय विधानसभा , जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीत भाजप ‘झिरो टू हिरो’ ठरली. त्यामुळे ‘रेल्वे’वर भाजपने येथील सत्तेचे समीकरण जुळविण्याकडे लक्ष केंद्रित केले. सहा वर्षे झाले रेल्वे कोच कारखाना रखडत सुरु आहे. मात्र त्यातून निर्माण होणारे रेल्वेचे डबेच मतदारांना आकर्षित करेल आणि भाजपसाठी विजयाचे इंजिन ठरेल असा व्होरा भाजपचा आहे.
दुसरे असे कि, १२ एप्रिल २०१६ रोजी मिरजेहून पाण्याने भरलेली रेल्वे लातूरकरांची तहान भागविण्यासाठी निघाली. त्यानंतर मात्र लातूर महापालिकेत भाजपचे ३६ नगरसेवक निवडून आले.इतकंच काय विधानसभा , जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीत भाजप ‘झिरो टू हिरो’ ठरली. त्यामुळे ‘रेल्वे’वर भाजपने येथील सत्तेचे समीकरण जुळविण्याकडे लक्ष केंद्रित केले. सहा वर्षे झाले रेल्वे कोच कारखाना रखडत सुरु आहे. मात्र त्यातून निर्माण होणारे रेल्वेचे डबेच मतदारांना आकर्षित करेल आणि भाजपसाठी विजयाचे इंजिन ठरेल असा व्होरा भाजपचा आहे.
मतदानाची टक्केवारी महत्वाची
या लोकसभा मतदारसंघात २००९ पासून मतदानाची टक्केवारी पाहिल्यास यंदा मतदान वाढले तरच भाजपला फायदा होणार आहे. अन्यथा पक्षातील नाराजांमुळे तसेच मतविभाजनाचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक कमी मतदान झाले तर ते सत्ताधारी पक्षाच्या पथ्यावर पडते असे संकेत असले तरी मागील काही निवडणुकांमध्ये ते चित्र बदलले आहे. त्यामुळे २००९ मध्ये ५४.९३ टक्के , २०१४ मध्ये ६२.६९ टक्के आणि २०१९ मध्ये ६२. १९ टक्के असे मतदान झालेले होते. त्यामुळे यंदा मतदान वाढते कि घटते याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर पडते हाच मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
‘वंचित’मुळे कुणाला फटका
गत लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुधाकर शृंगारे हे २ लाख ८९ हजार १११ मताधिक्य घेऊन विजयी झाले. विधानसभा निहाय मतदान पाहिल्यास महायुतीला ६ लाख ६१ हजार ४९५ मते मिळाली तर महाविकास आघाडीला ३ लाख ७२ हजार ३८४ मते मिळाली. मात्र वंचितने १ लाख १२ हजार २५५ मते घेतली. त्यामुळे या मतदारसंघात वंचितच्या मतांचा फटका हा महाविकास आघाडीला बसला ;पण यंदा राज्यातील सत्तेचा विचित्र प्रयोग मतदारांच्या पचनी पडलेला नाही. त्यात शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांचे झालेले विभाजन तसेच वंचितवर असलेला भाजपची बी टीम हा शिक्का पाहता यंदा वंचितचा फटका भाजपला बसू शकतो असे राजकीय अभ्यासकांचे ठाम मत असून आंबेडकरी चळवळीची मते ही काँग्रेसकडे जाणार त्यात भाजपमधील नाराजांची छुपी मदत काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामागे स्थानिक पातळीवरील बेरजेचे समीकरण हे काँग्रेसला जमेचे ठरणार आहे. (Latur Lok Sabha: Congress ready for supremacy; Who is the opinion of Laturkar?)