पुणे।प्रवीण पगारे
पुणे लोकसभा मतदारसंघाची (Pune Lok Sabha Election 2024) निवडणूक आता तिरंगी होणार आहे.मनसेला जयमहाराष्ट्र करून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेल्या वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) उमेदवारी दिली आहे.त्यामुळे महायुतीचे मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol), महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) आणि वंचितचे वसंत मोरे असा सामना रंगतदार होणार असला तरी दोन मराठा , एक ओबीसी अशी ही लढत लक्षवेधी ठरणार असली तरी वंचितने खेळलेला डाव कुणावर पलटणार हा मुद्दा यंदा महत्वाचा ठरणार आहे.त्यातही मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार हे जितके महत्वाचे ठरणार आहे त्याहीपेक्षा वंचितची ‘ ठरवून ‘ या सदरात खेळलेली खेळी यशस्वी ठरते का ? आणि एमआयएमची २ लाख ८९ हजार ७८ मते कुणाच्या पारड्यात जातात हे पाहणे यंदा औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Election 2024) अपेक्षेप्रमाणे वसंत मोरे यांना वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे.परिणामी पुण्यात दोन मराठा विरुद्ध एक ओबीसी असा सामना कुणाच्या पथ्यावर पडणार यावरून राजकीय वर्तुळात तर्क -वितर्क सुरू झाले आहेत.राजकीय अभ्यासकांच्या मते वंचित आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे हे एकत्र येणे शक्यच नव्हते. कारण त्यामुळे ओबीसींची मते ही आपसूक भाजपकडे वळली असती.कारण गेल्या दहा वर्षात भाजपने विविध पदांच्या माध्यमातून ओबीसी वर्गातील अनेकांना संधी दिली आहे.नेतृत्व दिले आहे.त्यामुळे जर वंचित पर्यायाने प्रकाश आंबेडकर आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांची युती झाली असती तर त्याचा भाजपला जास्त फायदा झाला असता.त्यामुळे युती झाली नाही;पण पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Election 2024) मराठा उमेदवार देवून वंचितने काय साधले ?हा खरा प्रश्न आहे.याकडे राजकीय अभ्यासक लक्ष वेधत आहेत.
गत लोकसभा निवडणुकीत वंचितने ६४ हजार मते मिळवली.विशेष म्हणजे अनिल जाधव हा उमेदवारही परिचित नव्हता.तरीही वंचितने मत विभागणी केली.त्याचा फटका प्रामुख्याने काँग्रेसला बसला हे जरी स्पष्ट असले तरी यंदा वंचितची मते किती वाढणार हा प्रश्न महत्वाचा आहे.त्यातही वसंत मोरे या मराठा उमेदवाराला रिंगणात उतरवून भाजपच्या मुरलीधर मोहोळ या उमेदवाराला खिंडीत गाठण्याचे वरकरणी दिसत असले तरी ते काँग्रेसला अडचणीचे ठरणार का? हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.त्यात या मतदारसंघात यंदा मुस्लिम समाजाची २ लाख ८९ हजार ७८ मते आहेत.ती कुणाला ‘वंचित’ करणार हा प्रश्न जितका महत्वाचा आहे त्याहीपेक्षा वंचितमधील ओबीसी वर्गांची मते भाजपच्या पारड्यात जाणार का ?हा महत्वाचा प्रश्न ठरणार आहे.कारण जो उमेदवार दिला तो वंचितमधील सहभागी मंडळी आणि मतदारांना रुचलेला नाही. उलट त्यातून वंचित ही भाजपची बी टीम आहे का? हाच संशय पुन्हा बळावला आहे.त्यामुळे वंचितमध्येच मतांची विभागणी होणार हे अटळ आहे; पण जो डाव ,ज्या हेतूने खेळाला तो कुणावर पलटणार हाच खरा मुद्दा आहे.तूर्तास तिरंगी लढत होणार असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घडामोडी वेगाने घडणार आहेत.त्यामुळे तिरंगी लढत शेवटी चौरंगी यंदा होते का ? जर झाली तर रिंगणात कोणता भिडू उतरणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यंदा ७२ हजार मतदार घटले
यंदा पुणे लोकसभा मतदार संघात गत निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ७२ हजारांनी मतदार घटले आहेत.विशेष म्हणजे मध्यवर्ती भागातील ही मते असल्याने त्याचा फटका कुणाला बसणार हाच मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे.
यंदा मतदारांची संख्या २० लाख तीन हजार ३१६ झाली आहे. सर्वाधिक मतदार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यांचे प्रमाण ३५.५९ टक्के म्हणजे ७ लाख १२ हजार ९८० आहे. त्या खालोखाल मराठा समाजाचे मतदार आहेत. त्यांचे प्रमाण १७.८५ टक्के म्हणजे ३ लाख ५७ हजार ५९२ आहे. आजवर ओबीसी आणि मराठा या समाजाच्या मतदारांनंतर ब्राह्मण समाजाची मते होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ब्राह्मण मतांऐवजी मुस्लिम मतदारांची संख्या ही वाढली आहे. सद्य:स्थितीत ब्राह्मण समाजाची १३.५७ टक्के म्हणजे २ लाख ७१ हजार ८५० मते आहेत. या मतदारांपेक्षा मुस्लिम मतदारांची संख्या वाढली आहे. मुस्लिम मतदारांचे प्रमाण १४.४३ टक्के म्हणजे २ लाख ८९ हजार ७८ इतकी झाली आहे.
मतदानाचा टक्का कसा वाढेल हेच महत्वाचे
एकीकडे लोकसंख्या वाढत असताना मतदार संख्या वाढणे अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात ती तब्बल 72 हजारांनी घटली आहे. त्या मागची कारणे काय याचा शोध घेतला तर वाहतूक कोंडी ,अरुंद रस्ते, वाढते प्रदूषण,पायाभूत सुविधांवर ताण यामुळे बहुतांश पुणेकर, जे मध्यवर्ती भागातील आहेत.इतकेच काय कोथरूड विधानसभा मतदारसंघातीलही अनेक मतदार हे भुगाव, भुकुम आदी भागात स्थलांतरित झाले आहेत. मात्र पेठांमधील निवासस्थाने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना भाडे तत्त्वावर दिली आहेत. त्यामुळे मध्यवर्ती भागात मतदान असणारे पुणेकर मतदानाला येतील का हा प्रश्न आहे. परिणामी यंदा मतदानाचा टक्का कसा वाढेल हेच महत्वाचे ठरणार आहे.
(Pune Lok Sabha Election 2024: Division of votes on whose path?)