Pune Lok Sabha Election: BJP's strategy; But who is the coward in the 'Vidhansabha'?

Pune Lok Sabha Election:  भाजपची व्यूहरचना ;पण ‘विधानसभे’त धाकधूक कुणाला ?

 … तर ऐनवेळी महिला उमेदवारालाच लोकसभेची उमेदवारी ? 

पुणे। भाजपने   लोकसभा निवडणुकीसाठी प्रा. मेधा कुलकर्णी इच्छुक असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना खासदार करून  त्यांचे राजकीय पुनर्वसन पक्षाकडून करण्यात आले आहे. परिणामी   लोकसभा निवडणुकीची ( Pune Lok Sabha Election )राजकीय गणितेही बदलणार आहेत. आता लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ (former Mayor Muralidhar Mohol)  यांना कितपत संधी मिळते याबाबत संभ्रमावस्था असून मोहोळ यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याचे अनुमान काढले जात आहे. त्यामुळे दुसरे प्रबळ दावेदार माजी आमदार जगदीश मुळीक (former MLA Jagdish Mulik)  यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल असे भाजपमधील कुणालाही वाटले नव्हते. कुलकर्णी यांना  राज्यसभा खासदार करून  भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे लोकसभेच्या पुण्याच्या आखाड्यात  ऐनवेळी दुसरेच नाव  येईल,याची धास्ती इच्छुकांना आहे.त्यात महिला उमेदवार देण्याबाबत  भाजपच्या वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय  सुरु असून तीन टर्म आमदार असलेल्या माधुरी मिसाळ यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक ( MLA Madhuri Misal) आहे.  तसे झाले तर पक्षांतर्गत सुरु असलेल्या ‘कांटे की टक्कर ‘ या वृत्तीला आळा बसेल आणि पुण्यातून  दोन महिला खासदार दिल्लीत प्रतिनिधित्व करतील अशी रणनीती (BJP‘s strategy)  आहे. 
परिणामी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे पुनर्वसन कसे होणार याकडे मुळीक गटाकडून लक्ष दिले जात आहे तर कोथरूड विधानसभा मतदारसंघ मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ‘सोडून’ देण्याचा ‘मोठेपणा’ विद्यमान आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील दाखवतील का ?  असा उपरोधिक सवालही राजकीय वर्तुळात विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
वडगाव शेरी – हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा  शह -काटशहाचे राजकारण 
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन करण्याची खेळी भाजपने यशस्वी केली आहे.लोकसभा निवडणुकीत  महाराष्ट्रातील  अपेक्षित जागांचे गणित सुकर करण्यासाठी मांडलेली ही खेळी असली तरी ‘एका दगडात’च्या धर्तीवर विधानसभा निवडणुकीत अव्वल ठरण्याची रणनीती भाजपची आहे.पुण्यापुरते बोलायचे तर आठ  विधानसभा मतदार संघावर पुन्हा कब्जा मिळविण्याचे मनसुबे त्यामागे आहेत. परिणामी राष्ट्रवादीने वडगाव शेरी व शिरूर लोकसभा कार्यक्षेत्रातील हडपसर या मतदारसंघावर मिळवलेला कब्जा आता पक्षांतर्गत दोन गटांच्या लढाईत कुणाकडे जातो किंबहुना त्याचे लाभार्थी कोण? हाच मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.त्यामुळे वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा  शह -काटशहाच्या राजकारणात परिवर्तन  नक्कीच दिसणार असे संकेत राजकीय अभ्यासकांकडून दिले जात आहेत.विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  या नवीन पक्षातून   विधानसभेच्या आखाड्यात उतरणाऱ्या उमेदवारांमुळे  मतांची फाटाफूट मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्यात गारद कोण होणार हाच खरा  मुद्दा  आहे. 
 
पहिल्या टप्प्यात नियोजन यशस्वीपणे अंमलात
लोकसभेची जय्यत तयारी करणाऱ्या जगदीश मुळीक यांना संधी नाही मिळाली तर काय? मग त्यांचे पुनर्वसन कसे करणार यापेक्षा पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरवले गेले तर कुणाची अडचण होणार यावरही आतापासून चर्चा सुरू झाल्या आहेत.राजकीय अभ्यासकांच्या मते जगदीश मुळीक यांनी ज्या पद्धतीने भक्तीमय  कार्यक्रमांची आखणी केली आहे.त्या  नागरिकांना भावत  आहेत.त्याचा त्यांना निश्चित फायदा होणार आहे.त्यात मुळीक यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी सुरु केल्या आहेत. एकप्रकारे पहिल्या टप्प्यात त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्याचे नियोजन यशस्वीपणे अंमलात आणले आहे. जगदीश मुळीक हे भाजपच नव्हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी – कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह सर्वपक्षीयांच्या भेटीगाठी घेत असल्याने त्याचा भाजपलाच फायदा होणार आहे. तर  दुसरे दावेदार मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच दिल्लीवारी केल्याची चर्चा आहे. त्यात समाज माध्यमांवरील प्रसिद्धीचा लेखाजोखा ग्राह्य धरावा याबाबींकडे लक्ष  वेधण्यात आल्याची चर्चा आहे. 
योग्य उमेदवार दिल्यास तुल्यबळ लढत
वास्तविक २००९ मध्ये मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर काँग्रेसचे लोकसभेत  मताधिक्य हे घटले. त्यावेळी मनसेची मते वाढली. काँग्रेस -राष्ट्रवादीची ताकद उपनगरांमध्ये जास्त होती. पण मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर भाजपची ताकद वाढली. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी एक वडगावशेरी हा तत्कालीन शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजेच आताच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. कसबा हा मतदारसंघ काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी खेचून घेतला.पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली पण इथे भाजपची पकड कायम आहे. 
कोथरूड हा मतदारसंघ २००९ ला शिवसेनेकडे मात्र त्यानंतर तो भाजपकडे आहे. २०१९ च्या निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात मनसेला जागा सोडण्यात आल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. त्यावेळी ५ पैकी काँग्रेसला ३ राजे राष्ट्रवादीला २ असे जागावाटप झाले होते.  पुणे कॅंटोन्मेंट व शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. कमी फरकाने दोन्ही ठिकाणी काँग्रेस पराभूत झाली. त्यामुळे  भाजपची  या मतदारसंघांवर चांगली पकड आहे.योग्य उमेदवार दिल्यास तुल्यबळ लढत होऊ शकते. 
मागील काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेली मतांची टक्केवारी पाहिली  तर काही मतदारसंघात काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकांची मते मिळालेली आहेत. तिथे काँग्रेसचा प्रबळ उमेदवार नसेल तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नवीन पक्षाचा उमेदवार आखाड्यात उतरवला जाणार आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर चाचपणी झाली असून सर्व्हे अंती जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सहाही विधानसभा मतदारसंघात वंचितला मिळालेली मतांची टक्केवारी पाहता, भाजपच काय अजित पवार यांच्या  राष्ट्रवादी काँग्रेसला मतांची फाटाफूट डोकेदुखी ठरणार आहे. महायुतीत आरपीआयला कितपत स्थान हा मुद्दा तापविताना ती मते स्वतःच्या पारड्यात कशी पडतील याचेच डावपेच होणार असल्याचे निरीक्षण आंबेडकरी चळवळीतील अभ्यासकांचे आहे. 
 
 ‘ बिल्डर ठेकेदारांचा मतदारसंघ’ काढायचाच बाकी
लोकसभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची  राष्ट्रवादीची जमेची ठरेल असा विश्वास भाजपला असला तरी  राष्ट्रवादीमधील विभाजनामुळे  अजित पवार  गटावर नागरिकांचा रोष वाढतच आहे.हे वास्तव आहे. त्यात आता काय ‘ बिल्डर ठेकेदारांचा मतदारसंघ’ काढायचाच बाकी अशी उपहासात्मक टीका टिपण्णी होत आहे. २०१९ च्या पुणे लोकसभा निवडणुकीत वडगावशेरी विधानसभा निहाय मतदान पाहिल्यास भाजपला १ लाख १७ हजार ६६४ मते या मतदारसंघातून मिळाली तर महाआघाडीतील काँग्रेसला ६० हजार ८४३ मते मिळाली. त्यात या मतदारसंघातून वंचितला २१ हजार ८९ मते मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मतांची फाटाफूट मोठ्याप्रमाणावर होणार आहे. पुणे लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपला जमेचा ठरणार असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपसमवेत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर गारद होण्याची वेळ ओढवू शकते.त्यात भाजप या मतदारसंघावर दावा ठोकू शकतो.  
 
दोन मतदारसंघात  परिवर्तनाचा ‘गजर’ निश्चितच
हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार चेतन तुपे यांची  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत ही ओळख. अभ्यासू आणि उत्तम  वक्तृत्व  या त्यांच्या जमेच्या बाजू मात्र ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेल्याने ते जनतेच्या  पचनी पडलेले  नाही.त्यामुळे त्यांच्यावर नागरिकांमधून  टीका टिपण्णी होत आहे.त्यात या मतदार संघातून  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नवीन पक्षातून  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना रिंगणात उतरविण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. रोखठोक भूमिका मांडणारे प्रशांत जगताप यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि त्यांच्या वक्तृत्वाने नागरिक प्रभावित आहेत.अभ्यासू असलेले आणि नागरिकांच्या हितासाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्या प्रशांत जगताप यांचे कडवे आव्हान दुसऱ्या गटातील विद्यमान आमदार चेतन तुपे यांना असणार आहे.त्यात हा मतदारसंघ  शिरूर लोकसभेच्या कार्यक्षेत्रात मोडतो.त्यामुळे आपसूक कार्यक्षम खासदार अमोल कोल्हे यांचे पाठबळ जगताप यांना मिळणार आहे.या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तसा काही प्रभाव नाही आणि मनसेची पूर्वीची स्थिती आता प्रबळ नाही.भाजपला आटोकाट प्रयत्न केले तरी या मतदार संघात दमदार कामगिरी करणे अवघड आहे.त्यामुळे मतांची फाटाफूट अटळ आहे. एकमेकांचा बदला घेण्याच्या राजकारणात यंदा  या दोन मतदारसंघात  परिवर्तनाचा ‘गजर’ निश्चितच होणार  असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नवीन पक्षाची रणनीती ही प्रतिस्पर्धी अजित पवार यांच्या पक्षाला गारद कसे करता येईल यानुसारच असणार आहे. त्यामुळे  महाविकास आघाडीद्वारे निवडणुकांना सामोरे जाताना मतदारसंघ अदला -बदल करण्याची व्यूहरचना आखली जाईल आणि मतांचे समीकरण सुकर केले जाईल. 
 
बारामती लोकसभा कार्यक्षेत्रातील खडकवासला हा मतदारसंघ लोकसभेसाठी राष्ट्रवादीला तसा डोकेदुखी ठरलेला आहे. त्यात विधानसभेला  कमी मतांनी पराभवालाही राष्ट्रवादीला  सामोरे जावे लागते. त्यात आता विभाजनानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले  आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आस्था वाढत असली तरी खडकवासला मतदारसंघातून त्यांना किती मताधिक्य मिळते हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे मात्र विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपचे गणित पुन्हा सुकर होईल हे निश्चित आहे. 
शिवाजीनगर मतदारसंघ हा भाजपकडे आहे. विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे ‘प्रगती पुस्तक’ सर्व आमदारांमध्ये अव्वल ठरले आहे. त्यामुळे पुणे लोकसभेसाठी त्यांनाही संधी मिळेल असा सूर राजकीय वर्तुळात असून त्यांचे वडील माजी खासदार अनिल शिरोळे यांना मिळालेल्या मताधिक्यांचा आधार त्यासाठी घेतला जात आहे. या मतदारसंघात काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली आहेत. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या नवीन पक्षाला हवा आहे आणि त्याबदल्यात वडगावशेरी मतदारसंघ देण्याची रणनीती असली तरी त्यामागे पर्वती हा मतदारसंघ जो भाजपला पोषक आहे तो काँग्रेसला देण्याचे ‘ गणित ‘ आहे. तिथे काँग्रेसची ताकद जास्त आहे.  पुणे कॅंटोन्मेंट हा मतदारसंघ भाजपकडे असला तरी येथून काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. भाजपला  जेमतेम मताधिक्य मिळाले असले तरी त्यामागे अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील लोकांचे त्यावेळी  योगदान  होते. 
कोथरूड हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला पण तो भाजपच्या ताब्यात आहे. गतवेळी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील निवडून आले पण त्यावेळी ‘आतून’ कुणी ‘हातभार’ लावला हेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आता लोकसभेचे प्रबळ दावेदार मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली नाही तर त्यांना हा मतदारसंघ सोडला जाईल का ? या प्रश्नापेक्षा तो मिळू दिला जाईल का ? हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत लढाईत मनसेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र या मतदारसंघात अजित पवार यांची राष्ट्रवादी तटस्थ राहील का हा खरा मुद्दा आहे. Pune Lok Sabha Election: BJP’s strategy; But who is the coward in the ‘Vidhansabha’? 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *