नवी दिल्ली।पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )यांनी राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांचे आजोबा आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न दिला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपा आणि रालोदची युती (Alliance of BJP and RLD)जवळपास पक्की झाली आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा फक्त होणं बाकी आहे. परिणामी हा इंडिया आघाडीला (India Aghadi)मोठा हादरा बसणार आहे.
राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी (Rashtriya Lok Dal chief Jayant Chaudhary)हे एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. रालोद( RLD) हा पक्ष उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा लढवू शकतो. त्याचबरोबर रालोदला राज्यसभेची एक जागा दिली जाऊ शकते. पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर रालोद प्रमुख जयंत चौधरी भावूक झाले. या पुरस्काराबद्दल जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
रालोद सध्या समाजवादी पक्षाबरोबर आणि पर्यायाने इंडिया आघाडीबरोबर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते भाजपाबरोबर ‘घरोबा’ करतील आणि एनडीएत सहभागी होतील, अशा बातम्या येत होत्या. त्याबाबत विचारल्यावर जयंत चौधरी म्हणाले, आता कुठल्या तोंडाने मी नकार देऊ? त्यामुळे भाजपा आणि रालोदची युती जवळपास पक्की झाली आहे. जयंत चौधरी म्हणाले, आज देशासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे. मी खूप भावूक झालो आहे. या पुरस्काराबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो. आपल्या पंतप्रधानांनी देशाची नस ओळखली आहे. देशात सर्व वर्गांतील लोकांचा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा सन्मान केला जात आहे. दुसऱ्या कुठल्याही सरकारमध्ये असं काहीतरी करुन दाखवण्याची क्षमता नव्हती. मला आज माझे वडील अजित सिंह यांची खूप आठवण येतेय. युतीत आम्हाला किती जागा मिळतील याकडे मी लक्ष देणार नाही, तुम्हीही (प्रसारमाध्यमे ) या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. मी कुठल्या तोंडाने तो प्रस्ताव नाकारू? मी समाजमाध्यमांवरील माझी कुठलीही पोस्ट डिलीट करणार नाही. जशी राजकीय परिस्थिती असेल त्यानुसार मी माझं मत मांडत राहीन असेही त्यांनी स्पष्ट केले.
मौन… दोन्ही बाजूचे दरवाजे उघडे
दुसरीकडे इंडिया आघाडीमधील पक्ष सातत्याने दावा करत होते की, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल हा पक्ष त्यांच्या आघाडीचाच एक भाग आहे. जयंत चौधरी इंडिया आघाडी सोडून कुठेही जाणार नाहीत. आम्ही सर्व पक्ष मिळून आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार आहोत. इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या वक्तव्यांबाबत प्रश्न विचारल्यावर जयंत चौधरी यांनी मौन बाळगले. जाता जाता जयंत चौधरी म्हणाले, मी माझे दोन्ही बाजूचे दरवाजे उघडे ठेवले आहेत.
(Alliance of BJP and RLD: Big blow to India Aghadi!)