पुणे
वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र गडकरी यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही, हे तपासावे लागेल असे स्पष्ट केले. शिवाय पदाचा आधार घेऊन कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्यांनी विकास कामात अडथळा कदापि आणू नयेत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
मागील पावणेदोन वर्षांपासून मी मुख्यमंत्र्यांसोबत काम करतोय कामांचा दर्जा चांगला राखण्यासाठी त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ते बारकाईने लक्ष घालतील, त्याची शहानिशा करतील. याची मला शंभर टक्के खात्री आहे,असेही अजित पवार यांनी नमूद केले. कामांचा दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे; पण जर एखादा ठेकेदार चांगले काम करत असतानाही काही जण एखाद्या राजकीय पक्षाचा आधार घेऊन, मिळालेल्या पदाद्वारे जर त्रास देत असतील , तर ते प्रकार ताबडतोब थांबले पाहिजेत. अशी भूमिकाही अजितदादा पवार यांनी यावेळी मांडली.