मुंबई । मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यावरून कासावीस झालेल्या आमदारांना आता कोणत्या गटाला प्राधान्य यावरून आता टाहो फोडावा लागणार अशी चिन्हे आहेत. त्यात शिंदे गटातील(Shinde group) आमदारांचा रौद्र अवतार पाहायला मिळणार असेही संकेत आहेत. त्यातच अखेर खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याला कोणते खाते दिले, याची आपल्याला माहिती नसल्याचेही अजित पवार स्पष्ट करताना पवार यांनी तीन पक्षाचे सरकार असल्याने तडजोड स्वीकारावीच लागते, असे सूचक भाष्यही केले. त्यामुळे अजित पवार गटाला हवी ती खाती मिळाली नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
एकीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष ठेवून असताना सरकारमध्ये राष्ट्रवादीतील एका गटाचा प्रवेश झाला. त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी कासावीस झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांची अवस्था बिकट झाली. त्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होऊन 12 दिवस उलटले आहेत. तरीही अद्याप खातेवाटप झालेली नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठकावर बैठका सुरू आहे. अखेर खातेवाटपाचा तिढा सुटल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. तरीदेखील तडजोड स्वीकारावी लागते, असे वक्तव्य करून त्यांनी मनासारखे खाती न मिळाल्याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली आहे. राज्यपालांची स्वाक्षरी होताच कोणाला कोणते खाते मिळाले हे जाहीर होणार आहे. याशिवाय अधिक माहिती देण्यास अजित पवारांनी नकार दिला. तसेच, अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला, यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
शिवसेना आमदारांच्या नाराजीची आपल्याला कल्पना नाही, असे म्हणत अजित पवारांनी हा विषय टाळला.आता शिंदे गटातील आमदार कोणता पवित्रा घेतात यावरून पुन्हा एकदा राजकीय आखाडा तापणार आहे. मात्र मनासारखी खाती कुणाच्या पदरात हाच मुद्दा गाजणार अशी चिन्हे आहेत. Ajit Pawar: Since there is a three-party government, compromises have to be accepted