अमरावती । उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा ( MLA Ravi Rana and MP Navneet Rana) आक्रमक झाल्या. त्यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला. या नंतर दोघांनाही अटक झाली. त्यावेळेस राणा दाम्पत्याच्या बाजूने राज्यातले भाजप (BJP) नेतृत्व उभे झाले. मात्र,आता त्याच राणा दाम्पत्याच्या विरोधात भाजपने (BJP) शड्डू ठोकले आहेत. इतकंच नाही तर जय श्रीरामच्या (chanting Jai Shri Ram) घोषणा देत अमरावतीमध्ये भाजपकडून राणा दाम्पत्याला विरोध करण्यात येत आहे.
विकास कामांच्या श्रेयावरून ही लढाई जुंपली असली तरी त्याची खुसखुशीत चर्चा रंगत आहे.विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. तसे आमदार रवी राणाही अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रस्तावित केली. मात्र, यातले एकही काम सुरू झालेले नाही. त्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी रवी राणाविरोधात आंदोलन केले. या कामांच्या ठिकाणी रवी राणा यांचे फलक लावले होते. त्या फलकाला काळे फासले. यावेळी भाजप आमदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यामुळे आगामी काळात हे वितुष्ट वाढणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या प्रतिक्रिया काय उमटतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
भाजपच्या प्रत्येक मोहिमेत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पुढे असतात. ते अधिकृतरित्या भाजपमध्ये नसूनही पक्षाच्या जवळचे मानले जातात. मात्र, त्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांशी सूत बिनसल्याचेच अधोरेखित झाले आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तर राणा दाम्पत्याने घेतलेला आक्रमक पवित्रा उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यांचे बोलविते धनी कोण, यावरूनही चर्चा रंगली. मात्र, आता स्थानिक भाजप नेत्यांशी सूत जुळत नसल्याने अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध भाजप असे चित्र विकासकामाच्या श्रेयवादावरून निर्माण झाले आहे.पण पक्षश्रेष्ठी कसा तोडगा काढतात याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.