मुंबई।उद्धव ठाकरेंनीच( Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री (CM)करायचे ठरवले. त्यांचे म्हणणे असे होते की शरद पवार साहेबांनी (Sharad Pawar) दबाव आणला आणि त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावे लागले. म्हणजे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असले असते. म्हणजे त्यांच्या मनात असलेलेच मुख्यमंत्री आता महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे त्यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही,असा टोला मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, मोठ्या माणसात आपण फार बोलायचे नसते. स्वत: नरेंद्र मोदींनी बोलावलेले असतानाही उद्धव ठाकरे आले नाहीत. मोदींना दिलेले वचन त्यांनी मोडले. यात मोदी साहेबांनी त्यांना माफ करायला हवं. शेवटी मोठ्या भावाने लहान भावाला माफ करायला हवे, असेही केसरकर यावेळी म्हणाले.
ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांनी मोदींचा अपमान केला, त्यानंतर हे जुळवून आणणे उद्धव ठाकरेंच्या हातात असल्याचे केसरकर म्हणाले. आम्हाला जेवढं शक्य तेवढं आम्ही केले. हे काळाच्या ओघात झालेली गोष्ट आहे असे सांगत एकनाथ शिंदे हे चांगला कारभार करतील असेही केसरकर म्हणाले.
अयोध्येत महाराष्ट्र भवन
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते राम मंदीरात जाऊन महाआरती करणार असून नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर केसरकर म्हणाले की, अयोध्येत जाणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांसाठी महाराष्ट्र भवन बांधण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. त्यामुळे उद्या शिंदे आणि योगी यांच्या भेटीत नक्कीच चांगले काही घडेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.