पोटनिवडणूक बिनविरोध कशी करायची की
‘वेळ मारून न्यायची’ या पेचात भाजप!
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर (After the death of Pune MP Girish Bapat) पुणे लोकसभेची पोटनिवडणूक (Pune Lok Sabha by-election)घ्यावी लागणार आहे मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Assembly Constituency By-Elections) दारुण पराभव पत्करलेल्या भारतीय जनता पार्टीला (BJP)लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आता महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)धास्ती आणखीनच भेडसावणार आहे. परिणामी ही पोटनिवडणूक बिनविरोध कशी करायची की ‘वेळ मारून न्यायची’ या पेचाला भाजपला (BJP) सामोरे जावे लागणार आहे. त्यात सहानुभूतीच्या नावाखाली दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांपैकी मुलाला किंवा स्नुषा यांना उमेदवारी मिळेल की पक्षातील अन्य इच्छुकांना संधी दिली जाईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेसला (Congress) यानिमित्ताने पुन्हा पुणे लोकसभा काबीज करण्याची संधी निर्माण झाली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीची रणनीती काय असेल यावरच भाजपचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे ठाम मत आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Assembly Constituency By-Elections) निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास जितका वाढला आहे त्याहीपेक्षा’ एकी’मुळे भाजपचा पराभव सहजशक्य आहे,यावर शिक्कामोर्तब झाले आहे.दुसरीकडे भाजपलाही अहंकार कसा अंगलट येऊ शकतो याचा धडा मिळाला आहे. त्यामुळे आत्मचिंतनात गर्क असलेल्या भाजपच्या गोटात आता ‘इलेक्टीव्ह मेरीट’ वरच आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी देण्याचा विचार सुरु झाला आहे.
‘कसब्या’च्या निकालाने समीकरणे बदलल्याने भाजपला आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी नवी रणनीती आखावी लागणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आत्मविश्वास डळमळीत झालेल्या भाजपला त्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत नाही, तोच लोकसभा पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. हक्काचा बालेकिल्ला गमावलेल्या भाजपला आता महाविकास आघाडीची धास्ती भेडसावत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या मुलाला किंवा स्नुषा यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे ;पण मुलगा गौरव आणि स्नुषा स्वरदा हे शहराच्या राजकारणात तसे नवीन आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देणे भाजपला महागात पडेल,असे भाजपमधील एका गटाचा मतप्रवाह आहे.त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी आगामी लोकसभेसाठी आधीच इच्छुक असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्यातही कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावलून ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्याने तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी उमेदवारी डावललेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाला पसंतीक्रम मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यात माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे नावही पुढे रेटण्याची शक्यता असून बांधकाम व्यावसायिक व राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे हेही रिंगणात दंड थोपटून उतरतील याकडेही लक्ष वेधले जात आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे काकडे यांनी थेट पक्षाच्या नेत्यांना अप्रत्यक्ष खडे बोल सुनावल्याने शहर भाजपमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी संघाकडून नेहमी आग्रहाने ज्यांचे नाव घेतले जाते त्या माजी खासदार प्रदीप रावत यांच्या नावाचा विचार करून पक्षातील खदखद चव्हाट्यावर येऊ नये याची खबरदारी घेतली जाईल ;मात्र प्रदीप रावत कितपत तयार होतील हाही प्रश्न आहे . याकडेही राजकीय अभ्यासक लक्ष वेधत आहे.
खासदारकीचा कालावधी पाहता,भाजप आता कोणती चाल खेळते हा मुद्दा महत्वाचा असणार आहे. कारण हक्काचा बालेकिल्ला गमावलेल्या भाजपला पुणे लोकसभा मतदारसंघही गमवावा लागणार असल्याची सद्यस्थिती आहे. त्यात विधानसभा मतदारसंघ निहाय समीकरणे बदलण्याची भीती महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला जास्त आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसला पुन्हा पुणे लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे त्याचा फायदा करून घेतला जातो की नाही हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसकडून प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व काँग्रेसकडून दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविणारे मोहन जोशी हेच सध्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे भावनिक मुद्द्यांवर न अडकता महाविकास आघाडीने लोकसभेची पोटनिवडणूक लढवली तर भाजपचा सरळ सरळ पराभव आहे. असा ठाम दावा राजकीय अभ्यासकांचा आहे.