रत्नागिरी
मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशीर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आता महत्त्वाची ठरणार आहे.या यात्रेच्या माध्यमातून ९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यात येणार आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांची तसेच पर्यटन विकासासाठी व्यावसायिकांची भेट केंद्रीय मंत्री नारायण राणे घेणार आहेत, अशी माहिती जनआशीर्वाद यात्रेचे कोकण प्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रमोद जठार म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे १९ ऑगस्टपासून मुंबई येथून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. १९ व २० ऑगस्ट रोजी मुंबई येथे, तर २१ ऑगस्ट रोजी वसई-विरार,२३ ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड, २४ ऑगस्ट रोजी चिपळूण, २५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि २६ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग या ठिकाणी नारायण राणे जनआशीर्वाद यात्रा करणार आहेत.यामध्ये ९ लोकसभा मतदारसंघ, 33 विधानसभा मतदारसंघ आणि सुमारे १ हजार किलोमीटरची ही यात्रा आहे. यात्रेमध्ये आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह २०० जण सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सर्व खासदार आपापल्या मतदारसंघात जनआशिर्वाद यात्रा आयोजित करत आहेत.
