मुंबई। रविंद्र धंगेकरांच्या विजयाने (Ravindra Dhangekar’s victory) जॉर्ज फर्नांडिस यांच्या विजयाची आठवण झाली. विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. जनतेच्या मताचा बुलडोझर हुकुमशाही विरोधात फिरवण्याची गरज आता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केले. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, सखा पाटील या मातब्बर उमेदवाराला त्यावेळी नवखा माणूस असलेल्या जॉर्ज फर्नांडिसने हरवले. पुण्यातील कसब्यात (Kasba Assembly By-Election) 30 वर्षांपासून भाजपचा (BJP) बालेकिल्ला भुईसपाट झाला. त्यामुळे विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. रविंद्र धंगेकर यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
पंतप्रधान पदाबाबतच्या चर्चांना उद्धव ठाकरे यांनी मात्र पूर्णविराम दिला. ठाकरे म्हणाले, मी स्वप्नात रमणारा नाही. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यावेळी माझ्यावर कशाप्रकारे आली. ते मी त्यावेळी सांगितले आहे. मात्र माझी अशी कुठलीही स्वप्न नाहीत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सामान्य लोकांनी घ्यायला हवे.असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, सूड भावनेतून आमच्यासोबत राहिलेल्या अनिल परब, नितीन देशमुख यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत. सूडाने पेटून तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. मेघालयात मोदी आणि शहांनी वाईट प्रचार केला. आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. 4 दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. आम्ही आता तुमच्या पक्षात यावे ही तुमची अपेक्षा आहे का? तुमच्या पक्षात आलेल्यांवरील आरोप कशाप्रकारे बंद करण्यात आले. हे दिसून येते.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.