नवी दिल्ली|भारतीय जनता पक्षासमोर(BJP} राष्ट्रीय स्तरावर आव्हान उभे करू शकण्याची क्षमता केवळ काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेस अधिक सक्षम झाली नाही तर भाजप विरोधकांची एकजूट हे निव्वळ स्वप्न ठरेल, असे खडे बोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (senior Congress leader and former Union Minister Jairam Ramesh)यांनी विरोधकांना सुनावले आहे.
विचारसरणी आणि संघटनाच्या जोरावर केवळ काँग्रेस हा भाजपला राष्ट्रीय स्तरावर पर्याय ठरू शकतो. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस समर्थ झाली पाहिजे. काँग्रेसने सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या केवळ २०० जागा लढवाव्या आणि अन्य जागा प्रादेशिक पक्षांना सोडाव्या, हा अट्टाहास विरोधकांनी सोडून द्यावा, असेही रमेश यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुनावले आहे.
भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra)समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते सहभागी झाले नाहीत, याकडे रमेश यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रणे दिली आहेत. काही जण यात्रेत सहभागी झाले. काही झाले नाहीत. हा त्यांचा निर्णय आहे.
मुळात विरोधकांची एकजूट या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आलेली नाही. काँग्रेस संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे आणि तो सफल होताना दिसून येत आहे, असा दावा रमेश यांनी केला.
यात्रेमुळे काँग्रेसला नवसंजीवनी
भारत जोडो यात्रेमध्ये कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकही उत्साहाने सहभागी होत आहेत. ज्या ठिकाणी यात्रा गेली नाही त्या ठिकाणी तिला पाठींबा व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर यात्रांचे आयोजन केले जात आहे. भाजपाच्या समाजमाध्यम आघाडीने बिघडवून टाकलेली राहुल गांधी यांची प्रतिमा बदलून टाकण्यात यात्रा यशस्वी होत आहे. एकूण यात्रेमुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून भाजप विरोधकांच्या एकजुटीला पोषक वातावरणनिर्मिती होऊ शकते, अशी शक्यताही रमेश यांनी वर्तविली. (Jairam Ramesh: The unity of the opposition will remain a mere dream.)