पुणे। जबाबदारीचे काम करणाऱ्या पत्रकारांना सुरक्षितता, स्थैर्य आणि स्वास्थ्य ( provide stability and security to journalists) उपलब्ध व्हावे यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सर्व प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी दिली.
अखिल भारतीय पत्रकार कल्याण संघाच्या वतीने (All India Journalist Welfare Association)आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा परिषद २०२२’ मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांना आठवले यांच्यासह माजी महापौर प्रशांत जगताप, सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या राही भिडे यांना मानाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच राजकारण, समाजसेवा, वैद्यकीय सेवा, उद्योजकता, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना आणि जनतेच्या हितासाठी आपल्या पद आणि अधिकाराचा प्रभावी उपयोग करणाऱ्या शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख परशुराम वाडेकर, पत्रकार कल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद दीक्षित, महासचिव वेदांत गोयल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेश वरळेकर, उपाध्यक्ष अमोल तोरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष आणि परिषदेचे संयोजक वसंत वाघमारे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी ‘दैनिक राजदंड’च्या नव्या स्वरूपातील अंकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पत्रकारांना विशेष संरक्षण देणारा कायदा राज्याने लागू केला आहे. केंद्र सरकारही त्याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, कायदा केला तरी त्याच्या काटेकोर अंमलबजावणीमध्ये अडचणी येतात. त्यात लक्ष घालावे लागेल, असे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्याच्या काळात पत्रकारांनी केलेली विधायक टीकाही सहन करण्याची तयारी दाखवली जात नाही. शब्दांना शब्दाने स्पष्टीकरण अथवा प्रत्युत्तर देण्याऐवजी मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पत्रकारांना विशेष संरक्षणाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्थैर्य लाभावे यासाठी पुणे, मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी पत्रकारांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या कामात आपण जातीने लक्ष घालू, असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले.
आगामी काळातही केंद्रात व राज्यात ‘आपले’च सरकार
सध्या केंद्रात आपले सरकार आहे. राज्यातही शिंदे फडणवीस सरकार आहे. कोणी काही वल्गना केल्या तरी राज्यातील सरकार कार्यकाळ निश्चितपणे पूर्ण करेल आणि आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतरही भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार पुन्हा सत्ता प्राप्त करेल, असा दावा आठवले यांनी केला.
आई आणि पत्रकारांनी आपल्याला घडविले
चळवळीतील एक कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री या आपल्या प्रवासात आईप्रमाणेच पत्रकारांनी देखील आपल्याला घडविले आहे. आईने काबाडकष्ट करून मला शिक्षण दिले. संस्कार आणि संघर्षाची प्रेरणा दिली. चळवळीत काम करत असताना बहुतेक वृत्तपत्राच्या पत्रकारांनी चळवळी आणि आंदोलनांच्या बातम्यांना व्यापक प्रसिद्धी दिली. त्यामुळेच एक संघर्षशील नेता म्हणून आपली देशभर प्रतिमा उभी राहिली, असे आठवले यांनी सांगितले. आपण चळवळीत कार्यरत असतानाच भूमिका नावाचे साप्ताहिक काढले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. मी पूर्णवेळ पत्रकार झालो असतो तर मंत्री झालो नसतो, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. अमोल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले तर सांगली जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी आभार मानले.
(Ramdas Athawale: Make every effort to provide stability and security to journalists)