मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या राजकारणात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांना जातीव्यवस्था आणि त्याचा इतिहास माहीत नसावा. त्यामुळे अज्ञानातून त्यांनी हे वक्तव्य केले आहे, असा टोला राष्ट्रवादीने लगावलाय.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणातील जात या फॅक्टरबद्दल रोखठोक मत मांडले मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा सर्वात मोठा झाला आहे, असे वक्तव्य केले होते. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींनीपर्यंत कोणी पोहोचलं ?असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस हा शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो ;पण राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातिव्यवस्थेचा इतिहास माहीत नसावा म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातिव्यवस्था उभ्या राहिल्या. त्यातून जातीचा आधार घेत अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुधा माहित नसावे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मूलक समाज घडविण्याचे काम केलं. हेही राज ठाकरे यांना माहित नसावे. त्या अज्ञानातून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं असावं असा चिमटाही त्यांनी काढला.
