गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election 2022) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व रेकॉर्ड तोडत अभूतपूर्व यश मिळवले मात्र या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi)केलेले ‘मी गुजरातचा पुत्र’ हे आवाहन निवडणुकीत विजयाचा मोठा फॅक्टर ठरला. मोदींनी गुजरातमध्ये वारंवार या वाक्याचा पुनरुच्चार केला. त्यात आम आदमी पक्षामुळे (AAP) थेट काँग्रेसचेच (Congress) नुकसान झाले. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस प्रभावी ठरली असती ;पण आपने त्यांचे मोठे नुकसान केले. याचा थेट फायदा भाजपला झाला.विशेष म्हणजे ३१ रॅली, ३मोठे रोड शो पंतप्रधान मोदींनी केले. एकूण ५२ जागांसाठी केलेल्या प्रचारात ४६ ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र त्यासाठी भाजपने दीड वर्षे आधी व्युहरचना आखली होती,२०१७ ला जिथे पराभव झाला होता, त्या मतदारसंघातून यंदा प्रचाराला सुरुवात केल्याने हे अभूतपूर्व यश भाजपाला संपादन करता आले असे विश्लेषण राजकीय जाणकारांनी केले आहे.
२०१७ च्या निवडणुकीत भाजपला फक्त ९९ जागांवर विजय मिळवता आला होता. गुजरातमध्ये सत्तेत आल्यापासून भाजपला प्रथम १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. परिणामी नेतृत्वाने यातून धडा घेतला आणि २०२२मध्ये विजयाची तयारी दीड वर्षापूर्वीच सुरू केली. निवडणुकीच्या आठवड्यापूर्वी गृहमंत्री अमित शहांनी बूथ स्तरावरील तयारीचा रोज आढावा घेणे सुरु केले होते.तसेच विधानसभा निवडणुकीच्या सुमारे एक वर्ष आधीच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींसह संपूर्ण मंत्रिमंडळच बदलले.
रुपाणींना हटवून पहिल्यांदाच निवडून आलेल्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. ‘नो रिपीट फॉर्म्युल्या’सह जुन्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर विधानसभा अध्यक्षही बदलण्यात आले.त्यामुळे भारतीय राजकारणात भाजपने पहिल्यांदाच असा प्रयोग गुजरातमध्ये केला. हा प्रयोग आता पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्ण सरकारच बदलण्यात आल्याने सत्ताविरोधी लाट संपुष्टात आली. शिवाय नव्या मंत्रिमंडळात जातीय आणि प्रादेशिक गणिते जुळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.त्याचबरोबर काँग्रेस सोडून भाजपत आलेल्या तीन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. पाटीदार समुदायाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह पटेल समुदायातील सर्वाधिक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.
२०१७ मध्ये मोरबी, सुरेंद्र नगर, अमरेली अशा जागांवर भाजपचा पराभव झाला होता. यावेळी तिथूनच प्रचार सुरु करण्यात आला. सौराष्ट्रात तर भाजपचा प्रचार निवडणुकीच्या ६महिन्यांच्या आधीच सुरु झाला होता. पक्षाने नव्याने पन्ना प्रमुख नियुक्त केले. जनतेत ज्यांच्याविषयी राग आहे अशा आमदारांना वगळण्यात आले. मोदी आणि अमित शहांनी अशा जागांवर लक्ष केंद्रित केले की जिथे २०१७ मध्ये भाजपला अडचणींचा सामना करावा लागला होता.त्यासाठी अनेक ठिकाणी नेत्यांचे तिकीट कापण्याचा धोका पत्करला. सप्टेंबर २०२१ मध्ये भाजप नेतृत्वाने गुजरातचे पूर्ण सरकारच बदलले. तेव्हा एकूण २४ जणांना मंत्री करण्यात आले होते. यात १० कॅबिनेट आणि १४ राज्य मंत्री होते. या निवडणुकीत पक्षाने ५ मंत्र्यांचे तिकिट कापले. ज्यांना तिकिट मिळाले त्यापैकी १९ जण विजयी ठरले. केवळ एकाच मंत्र्याचा पराभव झाला.
निकालांवरून सिद्ध होते की, मंत्रिमंडळ बदलणे आणि नवे मंत्री बनवणे भाजपसाठी योग्य ठरले.विशेष म्हणजे कोव्हिडनंतरची गुजरातमधील पहिली निवडणूक होती. कोव्हिडनंतर अव्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून सरकारवर खूप टीका झाली होती. लोकांमध्ये राग होता. भाजपने रुपाणी सरकार बदलल्यानंतर हा राग संपुष्टात आला.त्यात ‘मी गुजरातचा पुत्र’ हे मोदींचे आवाहन प्रभावी ठरले.त्यामुळेच काँग्रेसचा १४९ चा विक्रम मोडून भाजपने १५६ जागांवर विजय मिळवून गुजरातमध्ये नवा विक्रम रचताना पक्षाची पाळेमुळेअजून घट्ट रुजवली आहेत.
काँग्रेसचे नुकसान…
आपमुळे काँग्रेसचे नुकसान झाले असले तरी काँग्रेसच्या उमेदवारांना पक्षाच्या नेतृत्वाकडून हवी तशी ‘रसद’ मिळाली नाही. परिणामी काँग्रेसचे उमेदवार स्वबळावरच या निवडणुकीला सामोरे गेले. पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी या गुजरातमधील प्रचाराला आल्याच नाहीत तर राहुल गांधी अगदी उशिरा प्रचार मोहिमेवर आले. त्यामुळे त्याचा फटकाही काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. मुळात ज्यावेळी निवडणुकीचे वारे वाहू लागले. त्यावेळी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाचीच मोहिम सुरु झाली. त्यात सारेच गुरफटल्याने गुजरात मध्ये दयनीय कामगिरीला आता सामोरे जावे लागल्याचे अनुमानही राजकीय विश्लेषकांकडून काढण्यात येत आहे.