पुणे । गेल्या पाच-सहा वर्षात मला विदेशात जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. माझा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी ४ तारखेला रात्री उशिरा दीड वाजता विमान होते आणि गुरुवारी रात्री उशिरा परतणार होतो. पण अजित पवार नाराज आहेत, कुठेतरी गेलेत अशा चर्चा उठवण्यात आल्या. माझ्याशिवाय यांचं काय नडतं मला कळत नाही. दादाला काय खासगी आयुष्य आहे की नाही, असा संताप राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चाना उधाण आले होते. पहिल्या दिवशी रात्रीपासूनच ते शिबीरस्थळी दिसले नसल्याचे सांगितले जात होते. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाणही आले मात्र नाराजीसह तर्कवितर्कांवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यातील मावळ येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी या चर्चांवर जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली.
कारण नसताना बदनामी, गैरसमज निर्माण करण्यात आले. सहा महिन्यापूर्वी मी तिकीट काढले होते आणि त्यासाठीच गेलो होतो असे स्पष्ट करताना अजित पवारांनी मात्र नाराजीच्या चर्चांच्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी खापर फोडले. तुम्ही मध्यंतरी आजारी असल्याच्या चर्चा होत्या, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मध्यंतरी मला खोकल्याचा त्रास होता. नंतर काही दिवस मी दौऱ्यावर होतो. रात्री उशीरा आलो. इथं काहीही बातम्या देतात, काहीही फालतू बातम्या देतात, असेही ते म्हणाले.Ajit Pawar:… ‘Does Dada have a private life or not’?