पुणे ।केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन – ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) ( ‘EVM-VVPAT’) ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात अत्याधुनिक असे गोदाम उभारण्यात येणार आहे. रावेत येथील तीन हेक्टर २९ आर एवढ्या जागेत हे गोदाम उभारले जाणार असून या ठिकाणी तब्बल ७५ हजार मतदान यंत्रे ठेवण्याबरोबरच काही मतदारसंघांसाठीची मतमोजणीही करणेही शक्य होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील प्रत्येक जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदाम उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागेचा शोध घेण्यात आला. त्यात रावेत येथील जागा निवडणूक आयोगाच्या पसंतीस पडल्याने ती निश्चित करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणतात की , निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे ठेवण्यासाठी भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामाचा वापर केला जातो. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान यंत्रे ठेवण्यासाठी रावेत येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील पसंत पडल्याने या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये पुणे शहरात आठ मतदारसंघ, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन, तर उर्वरित ग्रामीण भागात दहा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान केंद्रांची संख्या आठ हजारांपेक्षा अधिक आहे. ही मतदान यंत्रे ठेवण्यासाठी हक्काची जागा मिळणे आवश्यक होते. पाऊस, वारा आणि आग यांपासून संरक्षण व्हावे, या हेतूने या गोदामाची उभारली केली जाणार आहे. सध्याचे धान्याचे गोदाम हे धान्य साठवणुकीकरिता बांधलेले आहे. वखार महामंडळाला देखील धान्याची साठवणुक करण्यासाठी गोदाम मिळणे आवश्यक होते. त्यामुळे मतदान यंत्रे ठेवण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला राज्य शासनाच्या उच्च अधिकार समितीची मंजुरी मिळाली असून राज्य शासनाकडून निधीही मिळणार आहे. (According to the instructions of the Central Election Commission: A state-of-the-art warehouse will be set up in Rawet for ‘EVM-VVPAT’!)