मुंबई
काँग्रेस सातत्याने सामान्य लोकांचा आवाज उठवत आहे ,तो आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर केंद्र सरकारने पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दबाव आणला आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे अकाऊंट बंद करण्यात आले आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे, शिवाय भाजप नेत्यांचे ट्विटर अकाऊंट का बंद होत नाही असा सवालही केला आहे.
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. त्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व पक्षाचे देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. ही कारवाई पक्षपातीपणाची आहे. केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्विट करून जेरीस आणल्यामुळेच मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटरने ही कारवाई केली आहे. या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करीत आहे ,असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार समाजात तेढ निर्माण करणारे, फूट पाडणारे,देश विघातक संदेश ट्विटरवरून देत असतात. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत ट्विटर करत नाही; पण थातूरमातूर कारणे देऊन काँग्रेसच्या शेकडो खात्यावर कारवाई करण्यात आली आहे. हा पक्षपातीपणा आहे, याकडे नाना पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
शेकडो खाती बंद
ट्विटरने अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्ष, मुंबई काँग्रेस, विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, जितेंद्र सिंह, महिला काँग्रेसच्या सुष्मिता देव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस व सोशल मीडिया चे अभिजीत सपकाळ यांच्यासह काँग्रेसची शेकडो खाती ट्विटरने बंद केली आहेत.
