मुंबई।महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतोय, हे दुर्दैव आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी एकनाथच राहावं, ऐकनाथ होऊ नये, असा खोचक टोला धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde)लगावला. (Dhananjay Munde targeted Eknath Shinde)त्यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेनी ‘तुमचा पण सगळा प्रवास मला माहितीये ना. सगळा प्रवास माहिती आहे. त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली. दाखवली ना? (Devendra Fadnavis) त्यामुळे हे जाऊद्या. पण परत परत दाखवता येणार नाही. मी कमी बोलतो. त्यामुळे जास्त काही बोलत नाही’ असा गर्भित इशारा मुंडेंना दिला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (२२ ऑगस्ट) विरोधक सत्ताधारी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. विरोधकांनी सत्ताधारी विशेषतः एकनाथ शिंदे आणि ४० बंडखोर आमदारांना डिवचलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही पलटवार केला. याच राजकीय कलगीतुऱ्यात धनंजय मुंडेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. त्यावर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत सभागृहातच गर्भित इशारा दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोक रोज बाहेर दोनच शब्द बोलत आहेत. दुसरा मुद्दाच नाहीये. परवा काहीतरी ताट वाटी चलो गुवाहाटी. धनंजय मुंडे पण तिकडे होते. इतकं जोरात बोलत होते की, असे वाटत होते किती वर्षांचे शिवसैनिक आहेत. बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते. घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. तुमचा पण सगळा प्रवास मला माहितीये ना. सगळा प्रवास माहिती आहे. त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली. दाखवली ना? त्यामुळे हे जाऊद्या. पण परत परत दाखवता येणार नाही. मी कमी बोलतो. त्यामुळे जास्त काही बोलत नाही , असं एकनाथ शिंदे म्हणाले.देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, पण परत परत दाखवता येणार नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना इशाराच दिला.
दरम्यान विधानसभेत दुपारी धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या या कलगीतुऱ्यानंतर सायंकाळी अनपेक्षितपणे करुणा शर्मा-मुंडे या विधानभवन परिसरात पोहोचल्या. विधानभवनात जाऊन करुणा शर्मा-मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली, हे कळू शकले नसले , तरी एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना दिलेल्या अप्रत्यक्ष इशाऱ्याशी याचे कनेक्शन लावले जात आहे.(CM Eknath Shinde’s implied warning to Munde: Stay Eknath, don’t become Eknath…then I know your whole journey!)