मुंबई।मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन एक महिना उलटला आहे. अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कशामध्ये अडकलेले आहे, हे कळायला मार्ग नाही. पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे. मग त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही, का त्यांनी जास्त आमदारांना मंत्री करतो असे सांगितले आणि संख्या वाढल्याने आता कसा समन्वय साधायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे हे मुद्दे उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन लोकांची कॅबिनेट म्हणजे किती महत्त्वाची कॅबिनेट? ( How important is a cabinet of two people) अशा उपहासात्मक शब्दात मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीसांच्या (shinde-Fadnavis) सरकारवर निशाणा साधला.
अजित पवार यांची मुंबईतील राष्ट्रवादी भवनात (NCP Bhavan in Mumbai) पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवारांनी राज्यातील विविध प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजित पवारांनी सत्कार समारंभावरूनही टोला लगावला.
यावेळी पवार म्हणाले की, मंत्रिमंडळ वाढवत नाही. आज सगळ्या खात्यांचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहे. उपमुख्यमंत्र्यांना; पण खाती दिलेली नाहीत. मी बरीच वर्ष प्रशासनात असल्यामुळे काही जणांना त्याबद्दल विचारले. प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ४२ जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतरही खूप जबाबदारी असते. त्यांच्यावर कामाचा खूप ताण असतो. आज बऱ्याचशा फाईल तुंबल्या आहेत. त्यावर सह्या करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नसल्यामुळे त्यांच्याकडे कोणती फाईल पाठवायची, नाही पाठवायची हा त्यांचा प्रश्न आहे. मला फक्त राज्य सरकारचा कारभार वेगाने होणे अपेक्षित आहे.
महागाई प्रचंड…सरकार काय पाऊले उचलणार?
महागाई प्रचंड वाढली आहे. भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. त्याबद्दल सरकार काय पाऊले उचलणार? काय निर्णय घेणार, हे सांगायला कुणी नाही. मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र देणार होतो. बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असते. दोन लोकांची कॅबिनेट म्हणजे किती महत्त्वाची कॅबिनेट आहे. ती उद्या असेलच. उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे.असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.