मुंबई। एकीकडे राज्यसभेच्या (Rajya Sabha) ६ जागांसाठी होत असलेली निवडणूक अटीतटीच्या अंतिम टप्प्यावर आलेली असताना, आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे.भाजपने (BJP)थेट न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.परिणामी येत्या काही दिवसात राजकीय वर्तुळात नव्या घडामोडी पाहावयास मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपचे (BJP) उमेदवार पियुष गोयल यांचे पोलिंग एजंट आमदार पराग अळवणी, त्याचबरोबर भाजपचे दुसरे उमेदवार अनिल बोंडे यांचे पोलिंग एजंट अतुल सावे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या मतांवर आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडीची तीन मते (Exclude 3 votes of Mahavikas Aghadi) बाद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती मंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांनी दिली असली तरी भाजपने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.
हा आहे आक्षेप
काँग्रेसच्या (Congress) आमदार व मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपले मत देताना तो पेपर त्यांच्या अधिकृत पोलिंग एजंटच्या हातात दिला असा आक्षेप आमदार पराग अळवणी यांचा आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनीही त्याच पद्धतीने मतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली असा आक्षेप आमदार अतुल सावे यांनी घेतला आहे. तसेच शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी सुद्धा मतदान करण्यापूर्वी ती मतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करून त्यांची मते बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे.(Exclude 3 votes of Mahavikas Aghadi)
नियम काय आहे?
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण ज्या कुणाला मत देत आहोत, तो मतदानाचा बॅलेट पेपर फक्त पोलिंग एजंटला दाखवायचा असतो. तेसुद्धा ठराविक अंतरावरून. मात्र यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड व सुहास कांदे या आमदारांनी पेपर लांबून न दाखवता पोलिंग एजंटच्या हातात दिला. त्यामुळे भाजपने आक्षेप घेतलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारीही भाजपने ठेवलेली आहे.