‘पीएमआरडीए’कडून २३ गावांच्या ‘डीपी’मध्ये ५०० एकर जागा आरक्षित व्हावी
पुणे|पुणे शहर (PUNE CITY)दिवसेंदिवस विस्तारत आहे. मात्र कचरा प्रश्न जटील होत चालला आहे.महापालिका हद्दीत समाविष्ट २३ गावांमुळे आगामी काळात कचरा प्रश्न आणखीनच पेटणार आहे. त्यामुळे आतापासूनच नियोजन केल्यास या कचरा प्रश्नावर मात करता येईल. त्यासाठी महापालिका हद्दीलगत शहराच्या चारही दिशेने कचरा निर्मूलन व प्रक्रियेसाठी ५०० एकर जागा आरक्षित करून त्याच्या एक कि.मी. पेरिफेरीमध्ये ‘बफर झोन’ तयार करण्याची मागणी पुणे महापालिकेतील काँग्रेसचे (CONGRESS) माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे केली आहे.
यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पीएमआरडीएसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालिका आयुक्त यांनाही पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि, सद्यस्थितीत पुणे शहराचा कचरा प्रश्न बिकट बनला आहे. त्यात पुणे महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश झाल्याने भविष्यात कचरा प्रश्न आणखीनच चिघळणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आतापासूनच कृती तसेच नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) तयार केला जाणारा विकास आराखडा (डीपी) हा त्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. या डीपीमध्ये त्यानुसार नियोजन होण्याची आवश्यकता आहे. पुणे शहराच्या हद्दीलगत चारही दिशांनी ५०० एकर जागा आरक्षित करून त्या जागेच्या एक कि.मी. पेरिफेरीमध्ये बफर झोन (नो मेन्स झोन्स ) केल्याने निवासी भाग त्यात असणार नाही व सद्यस्थितीत निर्माण झालेले प्रश्न भविष्यात उद्भवणार नाहीत. त्यासाठी शासनाच्या तसेच अन्य जमिनी ताब्यात घेऊन कचरा निर्मूलन व प्रक्रियेसाठी त्या जागा आरक्षित केल्यास कचरा वर्गीकरण, निर्मूलन, प्रक्रिया आदींची कामे नियोजनबद्ध होतील आणि त्याचा ताणही वाढणार नाही. तसेच सार्वजनिक आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टीने ही बाब महत्वाची आहे ;अन्यथा भविष्यात कचरा प्रश्नच बिकट होईल. पुणे शहराला कचऱ्याच्या जटिल समस्येतून बाहेर काढण्यासाठी शहराच्या चारही दिशेस कचरा निर्मूलन व प्रक्रियेसाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात ५०० एकर जागा आरक्षित ठेवावी व बफर झोनचा देखील यात प्रामुख्याने विचार करावा, असे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नमूद केले आहे. तसेच पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation)आयुक्तांनी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात ५०० एकर जागेच्या आरक्षणासाठी (Garbage issue, create a buffer zone of 500 acres in all four directions of the city)पीएमआरडीएकडे तातडीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.