ठाणे। सभास्थानी तलवार दाखवल्याने अखेर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 12 एप्रिल रोजी ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राम गणेश गडकरी चौकात पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) जाहीर सभेदरम्यान भेट म्हणून दिलेली तलवार (sword) म्यानातून बाहेर काढत राज ठाकरे यांनी सर्वांना तलवार दाखवली होती. नौपाडा पोलिसांनी भादंवि कायदा कलम 34 भारतीय हत्यार कायदा 1959 चे (Indian Arms Act 1959) कलम 4 व 25 प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे मनसेनेही जर राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray and Aditya Thackeray) यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा. तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे. त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज्यातील सर्वच नेत्यांनी सभेत तलवारी घेतल्या आणि काढल्या आहेत. मग फक्त राज ठाकरे यांच्यावरच गुन्हा का? असा सवाल करत सरकार जाणून बुजून मनसेला टार्गेट करत असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.