मुंबई। कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा गाजावाजा करायचा आणि महाविकास आघाडीतील मंत्री – नेत्यांना जेरीस आणायचे हा खटाटोप करणारे भाजप नेते (BJP leader Kirit Somaiya) किरीट सोमय्या हेच आता अडचणीत सापडले आहेत. युद्ध नौका आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाने गोळा केलेल्या कोट्यवधींच्या निधीवरून अडचणीत आलेल्या सोमय्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. झेड प्लस सुरक्षा असणारे किरीट सोमय्या हे आता ‘अज्ञातवासा’त गेले आहेत. नेमक्या या मुद्द्याचा आधार घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपवर निशाणा साधताना कमळाचं चिखल गेलं कुठं ? असा सवाल केला आहे.
सोमय्या नॉट रिचेबल झाले असल्याच्या प्रकाराबाबत बोलताना कमळाचं चिखल गेलं कुठे? असा प्रश्न माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. ‘हा दुसऱ्यांवर बोट दाखवून हातोडे घेऊन पळत होता, आता नॉट रिचेबल का आहे’ असा प्रश्न उपस्थित करत कागद आणि कायद्याची लढाई आहे. आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे ती लढाई लढू असे पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण…
पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शौर्य गाजवणारी आयएनएस विक्रांत ही युद्ध नौका भंगारात काढली जाणार होती. यावर या युद्धनौकेचे स्मारक बनवावे अशी मागणी पुढे आली. स्मारक बनविण्यासाठी निधी जमवण्यात आला. किरीट सोमय्या यांनीही निधी जमवला होता. मात्र तो निधी सरकारकडे जमा केला नव्हता. याविरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल झाली असून त्याविरोधात सोमय्या सत्र न्यायालयात गेले होते. सोमय्या यांनी जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला आहे. याच वेळी सोमय्या हे नॉट रिचेबल झाले आहेत.
दरम्यान न्यायालयात सोमय्यांच्या वकिलांनी जमवलेला निधी भाजपच्या खात्यात जमा केल्याचे सांगितल्याने सोमय्यांच्या अडचणी जितक्या वाढल्या आहेत, त्याहीपेक्षा भाजपची मोठी पंचाईत झाली आहे. हिशोब तपासणीची टांगती तलवार भाजपवर (BJP)असून सोमय्यांनी एकाकी पडू नये यासाठी ही ‘तजवीज’ आधीच करून ठेवली होती का हा मुद्दाही आता राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे.