मुंबई /पुणे । शिवतीर्थावर झालेल्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे( Raj Thackeray) यांनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याची घोषणा केली. मात्र, याला पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (MNS firebrand leader Vasant More from Pune) यांनी विरोध केला. परिणामी पुन्हा एकदा मनसेतील (MNS) नाराजी नाट्य समोर आलं. मात्र नाराज मोरे यांनी सोमवारी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान, ‘तुझ्या सर्व प्रश्नांना उद्या उत्तर सभेत उत्तरं मिळतील’, असा शब्द राज ठाकरे यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, ‘साहेबांना मी माझ्या मनातलं सर्व काही सांगितलं आहे. माझी परिस्थिती सांगितली. यावर साहेबांनी फार काही न बोलता वसंत ‘तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्याच्या सभेतून मिळतील’ असं सांगितलं आहे. मला आणि साईनाथला उद्याच्या ( दि १२ एप्रिल ) ठाण्यातील सभेत आमंत्रित केलेले आहे. तिथेच राज ठाकरे सर्व प्रश्नांची उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.
नाराज वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत असलेली गटबाजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. या पक्षांतर्गत होणाऱ्या गटबाजीवर राज ठाकरे यांच्यासोबत काही चर्चा झाली का? असा प्रश्न मोरे यांना विचारला असता ते म्हणाले की, ‘उद्याची सभा ही उत्तर सभा आहे. त्यामुळे या पक्षांतर्गत असलेल्या वादांना देखील उद्याच उत्तरे मिळतील, असं राज साहेबांनी सांगितले आहे. दरम्यान, उद्याच्या उत्तर सभेत राज ठाकरे आपल्या नेमकं काय उत्तर देणार, याकडे मनसेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.