निलेश राणेंची टीका : हा टाईमपास कशाला
मुंबई
शिवसेनेशी हाडवैर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाकडून आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका होत आहे. आता तर माजी खासदार निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवरून हा टाईमपास कशाला? असा टोला ट्विटरवरून हाणला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरु आहे. केंद्रसरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत ३७७ अंतर्गत केली. त्यावरून निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना टोला हाणला आहे. 377 अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचे मंत्री सभागृहात उत्तर देत नाही. तशी तरतूदच नाही. मग ह्या अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला?, असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्यावरही याआधी टीका केलेली आहे. त्यानंतर आता संसद रत्न पुरस्कार प्राप्त असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्याने आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रत्युत्तर कसे दिले जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.