news

कोरोना… ऑनलाईन शाळा पण मोबाईलच नाही… गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘तिच्या’ शिक्षणाचा मार्ग झाला सुकर!

पुणे
एकीकडे कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. मात्र आज कित्येक मुले – मुली अशी आहेत,ज्यांना परिस्थितीमुळे मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही. अशाच एका मुलीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नव्या कोऱ्या मोबाईलची भेट मिळाली आणि गुरु शिष्य भेटीसह तिच्या ऑनलाईन शिक्षणाचा मार्गही सुकर झाला.
जनता वसाहत येथील अगरवाल हायस्कूल येथे इयत्ता 2 री मध्ये शिकणारी समीक्षा शिवाजी कदम या गरीब कुटुंबातील मुलीला सामाजिक कार्यकर्ते व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी शिक्षणात खंड पडू नये म्हणून नवा मोबाईल भेट दिला आणि समीक्षाच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.
याबाबत अमित बागुल म्हणाले कि, कोरोनामुळे होत्याचं नव्हतं अशी अवस्था आज सर्वसामान्यांची झाली आहे. अर्थचक्र अजूनही काही रुळावर आलेले नाही. कित्येकांचे रोजगार गेले,तर अनेकांच्या नोकऱ्यांवरही गंडांतर आले. तरीही जगण्यासाठी धडपड सुरुच आहे. घरचे आर्थिक बजेट कोलमडलेले असताना मुलांच्या शिक्षणासाठी पालकांच्या जीवाची घालमेल होत आहे.
ज्या मोबाईलला पूर्वी शाळेत नो- एंट्री होती, तोच मोबाईल आज शाळा चालवतोय;पण अशी कित्येक मुले – मुली आहेत,ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईलच नाही,मग त्यांनी कसं शिकायचं ? आई – वडील दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी राबताहेत मग अँड्रॉइड मोबाईल आणणारच तरी कसा? अशीच एका मुलीची व्यथा पर्वती भागातील जनता वसाहत येथील यार्डी संस्थेत काम करणारे विजय गायकवाड यांच्याकडून समजली आणि या मुलीचे शिक्षण अँड्रॉइड फोन नसल्यामुळे खंडीत झाले असल्याचे कळले. या मुलीचे वडील इलेक्ट्रिशन असून गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे हाताला काम नसल्याने घरातील परिस्थिती अतिशय बेताची आहे. व आईदेखील घरकाम करून संसाराला हातभार लावते. मात्र त्यांना मुलीला शिक्षणासाठी अँड्रॉइड फोन घेऊन देणे परवडणारे नव्हते. त्यामुळे आम्ही क्षणाचा विलंब न लावता, भर पावसात जनता वसाहतीत पोहोचलो . एकीकडे गुरुपौर्णिमा साजरी होत असताना, जे ज्ञान आपल्याला शिक्षक देतात,त्या शिक्षकांना केवळ मोबाईल नसल्याने पाहू न शकणाऱ्या, ज्ञान घेऊ न शकणाऱ्या समीक्षाच्या हाती नवा कोरा अँड्रॉइड मोबाईल सोपवला आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. खऱ्याअर्थाने गुरु – शिष्य भेटीचा मार्ग गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोकळा झाला.

2 thoughts on “कोरोना… ऑनलाईन शाळा पण मोबाईलच नाही… गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘तिच्या’ शिक्षणाचा मार्ग झाला सुकर!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *