मुंबई।
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दक्षता घेण्याची सूचना राज्यसरकारला केली आहे. टास्क फोर्सने तर तिसऱ्या लाटेचाही इशारा दिला आहे. मात्र दुसरीकडे दहीहंडी उत्सवावरून भाजपच काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगपाखड केली. मंदिरे उघडण्यासाठी भाजपकडून आंदोलने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना लोकांच्या जीवापेक्षा अजेंडा महत्वाचा मानू नये अशा शब्दात विनंती केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सणांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव जोमाने वाढण्याची भीती टास्क फोर्सने वर्तवली आहे. राज्य सरकारने उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे. त्यानुसारच दहीहंडी साजरी करण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असे म्हटले होते. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य करताना सर्व जगामध्ये आपण जी परिस्थिती पाहत आहेत. तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. जर तिसरी लाट आली तर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नका, यामध्ये सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.