पुणे
आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी यंदा युवा चेहऱ्यांना सर्वाधिक संधी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या गोटात विचारविनिमय सुरु झाला असला तरी त्यावरून नवे – जुने हा नवा वाद उफाळून येण्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे.
यंदाच्या पुणे महापालिका निवडणुकीत कोणत्याही स्थितीत पक्षाचे स्पष्ट बहुमत कसे येईल यावर राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी ‘इलेक्टीव्ह मेरीट’नुसार उमेदवारी वाटपाचा फैसला होणार आहे चाचपणी म्हणून राष्ट्रवादीकडून दोन सर्व्हेही पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विशेष करून उमेदवार वाटपातील ‘घुसखोरी’ टाळण्यासाठी ‘इलेक्टिव्ह मेरिट’ तपासूनच प्रत्येक प्रभागात उमेदवारी कोणाला द्यायची याचा फैसला होणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागाचा तसेच विद्यमान माननीय, इच्छुक या सर्वांची वैयक्तिक व सामाजिक स्तरावरील प्रतिमेचा डाटा गोळा करण्यात आलेला आहे. त्यात कोण कुणाशी संबंधित आहे.स्थानिक पातळीवरील मतांचे समीकरण ते गटबाजी सर्व मुद्यांचाही समावेश या सर्व्हेच्या कामात करण्यात आला . सध्या राजकीय प्रवाहात नसणाऱ्या राजकीय मंडळींचा पालिकेतील पक्षीय बलाबलसाठीकसे उपयुक्त ठरतील किंबहुना त्यांचा पक्षाच्या उमेदवाराला कसा फायदा होईल याचीही माहिती गोळा करण्यात आली आहे. पक्षात गटबाजीविरहित उमेदवार प्रक्रिया व्हावी आणि पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळावे याकडेच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यात जनमानसात लोकप्रिय कार्यकर्ते, पण पक्षात यापूर्वी संधी न मिळालेल्या चेहऱ्यांना यंदा संधी देताना भाजपच्या विद्यमानांना ‘घरचा रस्ता’ दाखवण्याची रणनीती यामागे आहे.त्यामुळेच यंदा जुन्यांशी समन्वय साधून नव्या चेहऱ्यांना रिंगणात उतरवून पक्षाची दुसरी फळी भक्कम करण्याची रणनीती आहे. त्यामागे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदा ४० ते ५० टक्के युवा चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाणार असल्याची चर्चा आहे मात्र त्यावरून ज्येष्ठ मंडळींची, माजी नगरसेवकांची भूमिका नव्या वादाला खतपाणी घालणारी ठरेल असे राजकीय अभ्यासकांचे मत असले तरी सध्या राष्ट्रवादीत शहर पातळीवर सर्वाधिकार हे शहराध्यक्षांकडे आहेत. अभ्यासू आणि आक्रमक असलेल्या शहराध्यक्षांनी युवा वर्गाला प्राधान्य देऊन त्यांची ताकद वाढवत आहेत. एकप्रकारे पक्ष विस्तार आणि बळकटीकरण अपेक्षितरित्या होत असले तरी, त्यांच्या विरोधात पक्षातील काही स्थानिक ज्येष्ठ मंडळी मतभेद विसरून एकत्र येत उभे ठाकले आहेत. वरकरणी एकत्र असल्याचे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा जुन्यांशी समन्वय साधून युवकांना सर्वाधिक संधी देण्यात येईल अशी घोषणा यापूर्वीच केलेली आहे. त्यानुसारच पक्ष पातळीवर कृती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात पालिकेवरील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी ‘आयारामां’ना किंवा भाजपमधून ‘घरवापसी’ करणाऱ्यांना संधी दिली तर पक्षांतर्गत रोषालाही राष्ट्रवादीला सामोरे जावे लागणार आहे.याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.